Water Quality in New Scheme Improves Following Reverse Scoring
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या चाचण्यांना वेग आला असून, पाईपलाईनमधील गाळ काढण्यासाठी करण्यात आलेल्या रिव्हर्स स्कॉरिंगनंतर पाण्याची गुणवत्ता सुधारली आहे. जलशुद्धीकरण केंद्रात पोहो-चणाऱ्या पाण्याची गुणवत्ता आता तांत्रिकदृष्ट्या मान्य पातळीवर आल्याची माहिती गुरुवारी (दि.२१) महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी दिली. यासह उर्वरित कामे वेळेत पूर्ण झाल्यास जूनच्या पहिल्या आठवड्यातच शहराला नवीन योजनेतून अंदाजे ३० ते ४० एमएलडी वाढीव पाणीपुरवठा सुरू होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
नवीन पाणीपुरवठा योजनेचे पाणी नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचले आहे. त्यामुळे जलवाहिन्यांची तपासणी आणि दुरुस्तीची कामे मजीप्राकडून १४ एप्रिलपासून हाती घेण्यात आले होते. यात ११ मे रोजी पंपिंग सुरू करण्यात आली. त्यानंतर पाईपलाईनमध्ये साचलेल्या गाळामुळे पाण्याची टर्बिडिटी २६० एनटीयू इतकी नोंदविण्यात आली.
ही पातळी अधिक असल्याने प्रशासनाने तातडीने रिव्हर्स स्कॉरिंगची प्रक्रिया सुरू केली. तसेच जायकवाडी धरणातील पाण्याची टर्बिडिटी कमी असूनही पाईपलाईनमधील गाळामुळे पाणी गढूळ होत असल्याचे तांत्रिक तपासणीत स्पष्ट झाले. त्यानंतर निसर्ग नर्सरी, आर. एल. स्टील आणि अप्रोच बंड परिसरात टप्प्याटप्प्याने स्कॉरिंग करण्यात आले. या प्रक्रियेमुळे पाईपलाईनमधील साचलेला गाळ मोठ्या प्रमाणात बाहेर काढण्यात यश मिळाले. या स्कॉरिंगनंतर आता पाण्याची गुणवत्ता तांत्रिकदृष्ट्या मान्य पातळीवर पोहोचली आहे.
गळतीमुळे सहा दिवस अडथळा
बिडकीन येथील साई मंदिराजवळ १३ मे रोजी मुख्य पाईपलाईनमध्ये गळती आढळून आली. त्यामुळे पंपिंग थांबवून दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यासाठी सुमारे सहा दिवस लागले. त्यानंतर पुन्हा पंपिंग आणि चाचणी प्रक्रिया सुरू करण्यात आली.
उर्वरित कामे अंतिम टप्प्यात
सध्या पीएसीएल टँकचे अॅसिड पूफ पेंटिंग, पीईएसओ प्रमाणपत्र तसेच रिसायकल लाईनची काही तांत्रिक कामे अंतिम टप्प्यात आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर नवीन योजनेतून शहराला नियमित आणि वाढीव पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी सांगितले.
तपासणीत गुणवत्ता मान्य
जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याची २० आणि २१ मे रोजी तपासणी करण्यात आली. या पाण्याची टर्बिडिटी १५.९५ एनटीयू इतकी नोंदल्या गेली असून, ही पातळी तांत्रिकदृष्ट्या समाधानकारक आहे. त्यामुळे आता नियमित पुरवठ्याच्या दृष्टीने पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.