Sambhajinagar tanker water crisis pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar tanker water crisis : नो नेटवर्क वसाहतीमधील टँकरचा पाणीपुरवठा बंद

ऐन पावसाळ्यात नागरिक त्रस्त, १०५ पैकी ६० टँकरचे बिल थकले

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने नो नेटवर्क भागातील वसाहतींना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी दोन एजन्सी नियुक्त केल्या आहेत. त्यातील एकाकडे ४५, तर दुसऱ्याकडे ६० टँकरचे कंत्राट असून बिल थकल्याने दोन्ही एजन्सीने टँकर बंद केले होते. परंतु गुरुवारी सायंकाळी एका एजन्सीला देयके अदा करण्यात आली अन् दुसऱ्या एजन्सीला टाळण्यात आले. त्यामुळे शुक्रवारी (दि.१७) दुसऱ्या दिवशीही नागरिकांवर पाणीबाणीचे संकट कायम राहिले.

शहरातील नो-नेटवर्क भागात मोडणाऱ्या वसाहतीला महापालिका टँकरने पाणीपुरवठा करते. त्यासाठी महापालिका नागरिकांकडून प्रती कुटूंब प्रती ड्रमनुसार शुल्क वसूल करते. तर महापालिका प्रशासन टँकरद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या कंत्राटदार एजन्सींना त्यांचे बिल सादर होताच त्याची तपासणी करुन देयके अदा करतात. परंतु, मागील सहा महिन्यापासून या दोन्ही टँकर कंत्राटदारांना देयकेच अदा करण्यात आली नाही. वारंवार मागणी करुनही महापालिकेकडून थकीत बिल देण्यास विलंब केला गेला. त्यामुळे दोन्ही कंत्राटदारांनी टँकरव्दारे होणारा पाणीपुरवठा बुधवारी (दि. १५) बंद केला. त्यामुळे नो नेटवर्क सर्व १०५ टँकर बंद होते.

दरम्यान गुरुवारी (दि.१६) सायंकाळी एका कंत्राटदार एजन्सीचे थकीत बिलाचे देयक अदा करण्यात आले. त्यानुसार या एजन्सीने त्यांच्याकडील ४५ टँकरने शुक्रवारी पाणीपुरवठा सुरू केला. परंतु, सर्वाधिक टँकरचे कंत्राट असलेल्या राम इन्फ्रास्ट्रक्चर एजन्सीचे सुमारे दीड कोटी रुपयांचे देयक देण्यात आले नाही. त्यामुळे थकीत बिलापोटी कंत्राटदाराने ६० टँकर केले नाहीत.

या प्रकारामुळे ऐन पावसाळ्यात तीन दिवसांपासून पुंडलिकनगर , जयभवानीनगर, विजयनगर चिकलठाणा, हिनानगर, राजनगर सातारा-देवळाई, नक्षत्रवाडी कांचनवाडी भागात टँकरने पाण पुरवठा झाला नाही. नागरिकांनी मात्र आगाऊ पैसे भरूनही टँकरचे पाणी बंट झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

बिलेच उशिराने दिली

आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले की, बिल देण्याची प्रक्रिया सुरू असून, बिले उशिरा सादर करण्यात आले होते. त्यामुळे तपासणीत वेळ गेला. आता प्रत्येक महिन्याला टँकरचे बील जमा व्हावे, अशा सूचना केली आहे, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT