वाळूज महानगर : कंपनीला मटेरिअल पोहोचवताना अर्धे मटेरिअल मध्येच चोरून त्याची भंगारात विक्री करणाऱ्या दोन वाहनचालकांना पोलिसांनी अटक केली आहे. संदीप रमेश दाणे (वय ३२, रा. सिडको महानगर-१) व नीलेश संजय पवार (वय २१, रा. साजापूर) अशी आर-ोपींची नावे आहेत. चोरीचे मटेरिअल खरेदी करणाऱ्या राजू सलाउद्दीन शेख (वय २२, रा. पंढरपूर) यालाही पोलिसांनी आरोपी करून एकूण ४ लाख ६८ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
वाळूज येथील इंड्युरन्स कंपनीत मटेरिअलची ने-आण करणाऱ्या एका ट्रान्सपोर्टच्या बोलेरो (एमएच २०, डीटी ०१३१) वाहनावर संदीप आणि नीलेश चालक म्हणून काम करतात. १८ डिसेंबर रोजी कंपनीतून मटेरिअल भरल्यानंतर त्यांनी अर्धे मटेरिअल कृष्णा कोटिंग येथे टाकले आणि उर्वरित मटेरिअलची चोरी करून ते पंढरपूर येथील भंगार विक्रेता राजू शेख याला विकले.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रवीण पाथरकर, विनोद अंबुज, बाळासाहेब आंधळे, सुरेश भिसे, शिवाजी गायकवाड, संदीप तागड, रोहित चिंधाळे यांच्या पथकाने केली.
भट्टीत वितळवून बनवले गट्ट
गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक विनोद अंबुज यांनी १५ एप्रिल रोजी संशयित चालकांना अटक केली. पोलीस कोठडीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी राजू शेख याच्या दुकानाची झडती घेतली असता, त्याने चोरीचे अॅल्युमिनियम मटेरिअल भट्टीमध्ये वितळवून त्याचे गट्ट (लड) तयार केल्याचे समोर आले. पोलिसांनी १ लाख ६८ हजार ७५० किमतीचे अॅल्युमिनियम इंगोट आणि ३ लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण साडेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.