Waluj Mahanagar Surpanakha effigies were burnt by the victimized men
वाळूजमहानगर, पुढारी वृत्तसेवा शुर्पणखा वृत्तीचे दहन होऊन महिलांना सद्बुद्धी मिळो, अशा घोषणा देत पत्नी पीडित पुरुषांनी गुरुवारी (दि.२) करोडी शिवारातील पत्नी पीडित पुरुष आश्रमात शुर्पणखा प्रतिकृतीचे दहन केले.
महिलांचे सबलीकरण करताना पुरुषाचा विचार करण्यात कसूर झाला आहे. काही महिलांमधील वाईट वृत्तीमुळे संसार उद्धस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. स्त्रिया अबला होत्या तेव्हा त्यांच्यासाठी वेगळे कायदे बनविण्यात आले. तसेच महिलांना अनेक सुविधा दिल्या जात असल्याने त्यांच्यातील दुर्गुण वाढीस कारण बनत चालले आहे.
स्त्रिया आता सबला झाल्या असून, खऱ्या अर्थान पुरुष अबला बनत चालला आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. एन.सी.बीच्या रेकॉर्डनुसार आत्महत्येचे प्रमाण स्रियांपेक्षा पुरुषांचे जवळपास तीन पट अधिक असल्याचे सांगून भारत फुलारे यांनी पुरुषांसाठी स्वतंत्र पुरुष आयोग तसेच पुरुष व बाल कल्याण समितीची स्थापना करण्यात यावी.
घरगुती हिंसाचारापासून पुरुषाचे संरक्षण अधिनियम लागू झाले पाहिजे, अशी मागणी केली. यावेळी चरणसिंग गुसिंगे, सोमनाथ मनाळ, संजय भांड, भाऊसाहेब साळुंके, रामेश्वर नवले, सुरेश फुलारे, एकनाथ राठोड आदींसह पत्नी पीडित पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
विजयादशमीच्या दिवशी बहुतांश ठिकाणी रावणाच्या प्रतिकृती पुतळ्याचे दहन केले जाते. आम्ही महिलांच्या अन्यायी वृत्तीचे दहन करण्यासाठी आज विजयादशमीच्या दिवशी शुर्पणखेची प्रतिकृती तयार करून तिचे दहन केल्याचे पत्नी पीडित पुरुष आश्रमाचे अध्यक्ष अॅड. भारत फुलारे यांनी सांगितले.