छत्रपती संभाजीनगर : हॉटेलमध्ये सोबत काम करणाऱ्या दोन वेटरचे भांडण झाल्यानंतर त्यातील एकाला कामावरून काढण्यात आले. याचाच राग मनात धरून त्याने एका वेटरला चाकूने भोसकून सपासप वार करत जीवघेणा हल्ला केला. ही घटना सोमवारी (दि.६) मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास महावीर चौक, मच्छली खडक येथे घडली. नागरिकांनी दोन आरोपींना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. शिवराज आश्रुबा थोरबोले (१८, रा. गोजवडा, ता. वाशी, जि. धाराशिव) असे जखमीचे आहे.
याप्रकरणी गौरव ऊर्फ वीर सुदेश गायकवाड (२७, रा. भावसिंगपुरा) आणि बॉबी ऊर्फ बाळा विष्णू पगारे (२१, रा. नंदनवन कॉलनी) या आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, दोघांना न्यायालयाने ९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
फिर्यादी अनिकेत चंद्रकांत तोडकर (१९) आणि त्याचा मित्र शिवराज थोरबोले हे दोघे समसारा हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतात. त्यांच्यासोबत आरोपी वीर गायकवाड हा हॉटेलमध्ये कामाला होता. रविवारी (दि.५) गायकवाड आणि शिवराज यांच्यात काही कारणावरून वाद झाला होता. या वादानंतर वीरला हॉटेलमधून काढून टाकण्यात आले होते. अनिकेतने त्यावेळी दोघांना समजावून वाद मिटवला होता, मात्र वीरने या गोष्टीचा मनात राग धरला. सोमवारी मध्यरात्री काम संपवून अनिकेत, शिवराज आणि विक्रम सिंग हे तिघे पायी आपल्या रूमवर जात होते.
वाटेत मच्छली खडक येथे शिवराज सिगारेट घेण्यासाठी थांबला आणि इतरांना पुढे जायला सांगितले. अनिकेत आणि विक्रम थोडे पुढे अमित बारसमोर पोहोचले असता, काही वेळाने शिवराज पोटाला हात लावून आणि त्यांच्याकडे पळत आला. त्याच्या मागे वीर गायकवाड आणि त्याचा एक साथीदार चाकू घेऊन धावत होते. शिवराजने जवळ येऊन सांगितले की वीर आणि त्याच्या मित्राने त्याला चाकू मारला आहे. शिवराजच्या पोटाला आणि दोन्ही हाताला चाकू लागल्याने गंभीर जखम होऊन रक्तस्राव होत होता.
भोसकल्यानंतर पुन्हा चाकूने पाठीत वार
आरोपी वीर आणि त्याच्या साथीदाराने अनिकेतच्या समोरच शिवराजच्या पाठीवर पुन्हा चाकूने वार केले. अनिकेतने हल्लेख- ोराचा हात पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र शिवराजच्या डाव्या हातावरही चाकू लागला. आरडाओरड ऐकून नागरिकांनी धाव घेतली. गायकवाड आणि पगारे दोघांना पकडून सिटी चौक पोलिसांच्या स्वाधीन केले. घटनेनंतर अनिकेतने मित्र सौरभकांचनकरला फोन करून बोलावून घेतले. जखमी शिवराजला स्कूटीवरून घाटीत दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अनिकेतच्या तक्रारीवरून सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक मनीषा हिवराळे करत आहेत.