Voter Verification : घरोघरी जाऊन होणार मतदारांची पडताळणी file photo
छत्रपती संभाजीनगर

Voter Verification : घरोघरी जाऊन होणार मतदारांची पडताळणी

३० जूनपासून विशेष मोहीम, डुप्लिकेट व मृत मतदारांच्या नोंदींची होणार छाननी

पुढारी वृत्तसेवा

Voter verification will be conducted through door-to-door visits

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस विभागातील जिल्हाधिकारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी तसेच निवडणूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाने ही मोहीम हाती घेतली असून, कोणताही पात्र नागरिक मतदार यादीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी मदत कक्ष स्थापन करून वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध करून देण्याबरोबरच लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) आणि स्वयंसेवकांना विश्वासात घेऊन मोहीम राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेंतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मतदारांच्या घरी जाऊन गणना अर्जाचे वितरण व संकलन करणार आहेत. यावेळी मतदारांचे नाव, पत्ता, छायाचित्र तसेच इतर तपशीलांची पडताळणी करण्यात येणार आहे. अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा डुप्लिकेट नोंदींची तपासणी करून मतदार यादी अधिक अचूक करण्यावर भर दिला जाणार आहे. ही माहिती डिजिटल पद्धतीने वेळेत अद्ययावत करण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या.

बैठकीत मोहिमेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. मतदान केंद्रनिहाय उद्दिष्टे, मतदार यादी मॅपिंग, मनुष्यबळ उपलब्धता, प्रशिक्षण, पडताळणी प्रक्रिया आणि अर्ज व्यवस्थापनाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशिक्षण, जनजागृती, बीएलओ नियुक्ती आणि अर्ज वितरणासाठी आवश्यक तयारी पूर्ण झाल्याची माहिती सादर केली.

यावेळी नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, परभणीचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, धाराशिवच्या जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी, मंजुषा मिसकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT