अतिक्रमण  file photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar VIP Road encroachment - व्हीआयपी रोडवरील बाधित बांधकामांवर कारवाईचे सावट

VIP Road encroachment removal and land acquisition- मुदत संपली : पोलिस बंदोबस्त मिळताच हटविणार अतिक्रमण, परवानाधारक मालमत्तांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : भडकलगेट ते लेबर कॉलनीदरम्यान व्हीआयपी रोडच्या रुंदीकरणासाठी बाधित होणारे बांधकाम हटविण्याची महापालिकेने दिलेली मुदत मंगळवारी (दि. २७) सायंकाळी संपली. मनपाकडून देण्यात आलेल्या मुदतीत काही मालमत्ताधारकांनी स्वतःहून बाधित भाग काढून घेतला असला, तरी अनेक ठिकाणी बांधकामे अद्याप कायम आहेत. त्यामुळे पोलिस बंदोबस्त उपलब्ध होताच महापालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे. मात्र, बांधकाम परवानगी असलेल्या मालमत्तांच्या बाबतीत नोटीस देऊन भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार असल्याने कारवाई करताना कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

नवीन विकास आराखड्यानुसार व्हीआयपी रोडची रुंदी ३० मीटरवरून ३५ मीटर करण्यात आली आहे. या विस्तारित रुंदीप्रमाणे महापालिकेच्या नगररचना विभागाने सोमवारी (दि. २६) प्रत्यक्ष जागेवर मार्किंग केले. या प्रक्रियेत अनेक मालमत्तांचे १० ते १५ फूट क्षेत्र रस्त्याच्या रुंदीकरणात बाधित होत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संबंधित मालमत्ताधारकांमध्ये चिंता निर्माण झाली. बाधित जागेचा मोबदला दिल्यानंतरच बांधकाम हटवावे, अशी मागणी मालमत्ताधारकांकडून करण्यात आली आहे.

तसेच काही मालमत्ताधारकांनी बांधकाम परवानगी नसतानाही बाधित क्षेत्र स्वतःहून हटविले आहे. मात्र, भडकलगेट, टाऊन हॉल आणि किलेअर्क परिसरातील अनेक मालमत्ताधारकांनी अद्याप बांधकामे काढलेली नाहीत. दरम्यान, व्हीआयपी रोडवरील सुमारे १२ ते १३ मालमत्ताधारकांकडे बांधकाम परवानगी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महापालिकेने यापूर्वी ३० मीटर रुंदीच्या परवानगी दिली होती. आता रस्त्याची रुंदी वाढविण्यात आल्याने या मालमत्तांमधील बाधित क्षेत्रासाठी संबंधितांना रीतसर नोटीस देऊन भूसंपादनाची प्रक्रिया करावी लागणार आहे. परवानगी आणि मालकीसंबंधीच्या बाबी तपासून पुढील कार्यवाही करावी लागेल. तर काही मालमत्ताधारकांनी मंगळवारी (दि. २७) न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश मनपाला दिल्याची माहिती अतिक्रमण हटाव विभागातील सूत्रांनी दिली.

बंदोबस्ताची प्रतीक्षा

पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीच्या कामामुळे पोलिस बंदोबस्त उपलब्ध होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्हीआयपी रोडवरील बाधित बांधकामे हटविण्याची कारवाई बुधवारीच (दि. २८) सुरू होईल, याबाबत अनिश्चितता आहे. बंदोबस्त मिळाल्यानंतर मनपा प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात करणार आहे.

मोबदल्याची मागणी कायम

रुंदीकरणात बाधित होणारे क्षेत्र हटविण्यापूर्वी त्याचा मोबदला द्यावा, अशी मालमत्ताधारकांची मागणी कायम आहे. बांधकाम अनधिकृत असले, तरी जागेची मालकी नागरिकांकडे असल्याने बाधित जमिनीचा मोबदला मिळणे आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेसोबतच मोबदला आणि भूसंपादनाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT