नाचनवेलच्या संतप्त ग्रामस्थ आणि पालकांनी शाळेला कुलूप ठोकले Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar ZP School | नाचनवेलच्या शाळेला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप; 4 वर्षांपासून इंग्रजी, गणित, विज्ञान विषयांचे शिक्षक नाहीत

शिक्षक उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत शाळेचे कुलूप उघडले जाणार नाही, असा इशारा सरपंच कासाबाई थोरात यांनी दिला आहे

पुढारी वृत्तसेवा

Kannad Nachanwel Lock School

पिशोर : कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथील जिल्हा परिषद शाळेत गेल्या चार वर्षांपासून इंग्रजी, गणित आणि विज्ञान या महत्त्वाच्या विषयांसाठी शिक्षक उपलब्ध नसल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थ आणि पालकांनी शाळेला कुलूप ठोकले. वारंवार निवेदने देऊनही शिक्षकांची नियुक्ती होत नसल्याने पालकांनी अखेर आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचे पाऊल उचलले आहे. जोपर्यंत या विषयांसाठी शिक्षक उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत शाळेचे कुलूप उघडले जाणार नाही, असा इशारा सरपंच कासाबाई थोरात यांनी दिला आहे.

नाचनवेल येथील जिल्हा परिषद शाळेत सध्या तब्बल २७७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांची संख्या मोठी असतानाही इंग्रजी, गणित आणि विज्ञान या विषयांसाठी २०२२ पासून नियमित शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याची तक्रार पालकांनी केली आहे.

विशेषतः विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी या तीनही विषयांचा भक्कम पाया महत्त्वाचा असतो. मात्र, शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांना अपेक्षित मार्गदर्शन मिळत नसल्याने त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता पालकांनी व्यक्त केली आहे. चार वर्षांपासून हा प्रश्न कायम असूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने पालकांमध्ये नाराजी वाढली आहे.

वारंवार निवेदने देऊनही प्रश्न कायम

मुख्य विषयांचे शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामस्थ आणि पालकांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदने दिल्याचे सांगण्यात आले. संबंधित अधिकारी आणि प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही अद्याप शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

प्रशासनाकडून वेळोवेळी आश्वासने दिली जातात; मात्र प्रत्यक्षात शिक्षक उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता केवळ आश्वासनांवर समाधान न मानता प्रत्यक्ष शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.

‘शिक्षक मिळेपर्यंत कुलूप उघडणार नाही’

२७७ विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेला हा प्रश्न प्रशासनाने गांभीर्याने घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. इंग्रजी, गणित आणि विज्ञान या विषयांसाठी शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत शाळेचे कुलूप उघडणार नाही, अशी भूमिका सरपंच कासाबाई थोरात यांनी घेतली आहे.

शाळेला कुलूप ठोकण्यात आल्याने प्रशासनापुढे आता हा प्रश्न तातडीने सोडविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था करून संबंधित विषयांचे शिक्षक उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी पालक व ग्रामस्थांनी केली आहे.

चार वर्षांपासून प्रलंबित असलेला शिक्षकांचा प्रश्न तातडीने मार्गी लावून विद्यार्थ्यांना नियमित आणि दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT