Sambhajinagar Crime News : पीडितेला धमकावून बलात्कारी सावत्र बापाविरुद्धची साक्ष बदलवली File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime News : पीडितेला धमकावून बलात्कारी सावत्र बापाविरुद्धची साक्ष बदलवली

विद्यादीपच्या सिस्टरशी मिलीभगत करून आरोपीच्या भावाचे कृत्य

पुढारी वृत्तसेवा

Victim threatened, changed testimony against rapist stepfather

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मुलींच्या छळाच्या प्रकारानंतर सरकाने टाळे ठोकलेल्या छावणी भागातील विद्यादीप बालगृहातील छळाचे आणखी गंभीर प्रकार समोर येत आहेत. सावत्र बापाने १७ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याने ती बालगृहात दाखल झाली. बाप हसूल जेलमध्ये कैद झाला. दरम्यान, आरोपी बापाच्या भावाने बालगृहातील सिस्टरच्या मदतीने वारंवार तिला भेटून कोर्टात बलात्कार झालाच नसल्याची खोटी साक्ष द्यायला भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात बलात्कार करणारा सावत्र वाप, त्याचा भाऊ आणि बालगृहातील कमल सिस्टर विरुद्ध गुन्हा दाखल झाला. दरम्यान, भावाला अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक विवेक जाधव यांनी शुक्रवारी (दि. २५) दिली.

पीडित १७ वर्षीय संगीता (नाव बदलेले) ही ऑक्टोबर २०२३ पासून विद्यादीपमध्ये राहायला होती. तिच्या तक्रारीनुसार, तिच्यावर सावत्र बापाने अत्याचार केला. तिच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल होताच पोलिसांनी त्याला अटक केली. सध्या तो हसूल कारागृहात कैद आहे. दरम्यान, त्याचा भाऊ हा तिचा सख्खा काका असल्याचे भासवून बाल कल्याण समितीची परवानगी न घेता कमल सिस्टर कमलच्या मदतीने बालगृहात यायचा.

तिथे दोघे तिला सावत्र बापा विरुद्धची तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकायचे. जबाब बदलला नाही तर तुला जिवे मारू, अशी धमकी दिली. कोर्टातील सुनावणीच्या वेळी समितीची परवानगी न घेताच कमल सिस्टर संगीताला घेऊन गेली. तिथे गेल्यानंतर पीडितेच्या सावत्र वडिलांचा भाऊही आला. तिच्या वडिलांना कोर्टात आणल्यानंतर भावाने बघ तुझ्या वडिलांची काय हालत झाले आहेत, आता त्यांना वडील मारतील या भीतीने संगीताने अत्याचार सोडून दे आणि केस मागे घेऊन टाक. कोर्टात सांग की, तुझे काहीही संबंध झालेले नाही, असे धमकावले. केला नसल्याचा जबाब दिला. दुसऱ्या प्रकरणात सिस्टरकडून मारहाण, काम करून घेत उपाशी ठेवले

दुसऱ्या प्रकरणात १७ वर्षीय मीरा (नाव बदललेले) डिसेंबर २०२२ मध्ये विद्यादीप बालगृहात दाखल झाली. तिच्या तक्रारीनुसार, त्यांना सांभाळणाऱ्या सिस्टर मंगल शहा वेळेवर जेवण देत नव्हत्या. त्यांचे व इतरांचे कपडे मुलींकडून धुवून घेत होत्या.

जेवण तयार करायला लावायच्या. पाणी भरून वरच्या मजल्यावर घेऊन जायला लावत होत्या. रूमची स्वच्छता केली नाही म्हणून मीराला लाकडी छडीने अमानुषपणे मारहाण केली होती. ती जानेवारी २०२३ मध्ये बालगृहातून पुन्हा आईकडे राहायला गेली. मात्र दर तीन महिन्यांना तिची बाल कल्याण समितीच्या समोर हजेरी असायची. त्यावेळी तिने सप्टेंबर २०२३ मध्ये बालगृहातील छळाबाबत समिती अध्यक्ष आशा शेरखाने यांच्याकडे लेखी तक्रार नोंदवली होती. त्यानंतर संगीताच्या तक्रारीवरून गुरुवारी (दि. २४) सिस्टर मंगल शहा विरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना कारवाईसाठी २०२३ मध्येच पत्रव्यवहार

पीडित मुलीने २०२३ मध्ये मारहाण, छळ झाल्याची आमच्याकडे तक्रार केली होती. त्यावेळी बाल कल्याण समितीच्यावतीने आम्ही छावणी पोलिस निरीक्षकांना विद्यादीपच्या अधीक्षका व इतर कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाईसाठी लेखी पत्र दिले होते. त्यानंतरही कारवाई न झाल्याने दोन वेळा स्मरणपत्र दिले होते.
आशा शेरखाने-कटके, अध्यक्षा, बाल कल्याण समिती

खोटे व्हिडिओ दाखविले

संगीताला घाबरवण्यासाठी त्याने तिच्या सावत्र बापाचे हाल होत असल्याचे अनेक नाटकी व्हिडिओ दाखवले. तसेच तुझ्यामुळे बापाची काय हालत झाली बघ. मी घर विकले आहे, वडील बाहेर आले तर तुला चांगले सांभाळतील, असेही आमिष त्याने दाखवले होते. त्यावेळी सिस्टर कमलही त्याच्या सोबतच होती. बालगृहात वारंवार येऊन त्याने संगीतावर दबाव टाकला. धमकावून जबाब बदलवून घेतला.

जबाब बदलल्यानंतरही पुन्हा येऊन धमकावले

२५ मे २०२५ रोजी आरोपीचा भाऊ पुन्हा संगीताला भेटायला आला. त्याने तुझा जबाब कोर्टात बदलला आहे, आता तू आमच्यासाठी मेली आहे. आता मी कधीच येणार नाही. आता पुन्हा जबाव बदलला तर तुला मारून टाकेल, अशी धमकी देऊन निघून गेला. तो पुन्हा कधी आलाच नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT