वाळूज महानगर : साजापूर येथे माजी जिल्हा परिषद सदस्य सय्यद कलीम यांच्या निधीतून दीड-दोन वर्षांपूर्वी आरोग्य उपकेंद्र बांधण्यात आले आहे. ही इमारत आरोग्य विभागाच्या ताब्यात देण्यापूर्वीच टवाळखोरांनी इमारतीच्या फरशीची तोडफोड करून दरवाजे, खिडक्या तसेच कडीकोयंडे, पाण्याची टाकी, नळाचे पाईप चोरून नेले.
साजापूर येथील जिल्हा परिषद शाळेजवळ दीड-दोन वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य सय्यद कलीम यांच्या निधीतून लाखो रुपये खर्च करून आरोग्य उपकेंद्र उभारण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेला चोहबाजूंनी संरक्षक भिंत बांधण्यात आली असली तरी रात्रीच्या वेळी या भागात कोणी फिरकत नसल्याने येथे टवाळखोरांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
त्यांच्याकडून या आरोग्य उपकेंद्राच्या फरशीची तोडफोड करण्यात आली असून या इमारतीचे दरवाजे, खिडक्या चोरून नेल्या आहेत. ही इमारत ओस पडल्याने रात्रीच्या वेळी याठिकाणी टवाळखोर दारू पिऊन गोंधळ घालत असतात.
शाळेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही चोरी
येथील जि.प. शाळेत काही महिन्यांपूर्वी टवाळखोरांनी शाळेच्या वर्गखोल्यांची विद्युत वायरिंग चोरून नेली आहे. त्यांचे हे कारनामे उघड होऊ नये म्हणून शाळा परिसरात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरेदेखील टवाळखोरांनी चोरून नेले आहेत. त्यांच्या या वाढत्या उपद्रवामुळे मुख्याध्यापक, शिक्षकही त्रस्त झाले असून पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची मागणी पालकवर्गातून केली जात आहे.
आरोग्य उपकेंद्राची लवकरच दुरुस्ती
माझ्या निधीमधून साजापूर येथे आरोग्य उपकेंद्र बांधले आहे. टवाळखोरांनी इमारतीच्या फरशीची तोडफोड करून दरवाजे तसेच खिडक्या चोरून नेल्या आहेत. दोन-तीन दिवसांत दरवाजे व खिडक्या बसवून इमारतीची दुरुस्ती करून ही इमारत आरोग्य विभागाच्या ताब्यात देऊ असे माजी जिल्हा परिषद सदस्य सय्यद कलीम व प्रभारी सरपंच शेख कैसर यांनी सांगितले.