Valve on main water main fails near Jayakwadi
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मोठ्या अपेक्षांनी सुरू करण्यात येत असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेला प्रारंभीच तांत्रिक अडथळ्यांचा सामना करावा लागला आहे. जायकवाडी वसाहतीलगतच्या स्मशानभूमीजवळ २५०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील स्कोअर व्हॉल्व्हचे बास्केट तडकून मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाल्याने शुक्रवारी (दि.१२) शहरासाठी नियोजित पाणीपुरवठा होऊ शकला नाही. जर तांत्रिक अडचणी कायम राहिल्या तर शहराच्या पाणीपुरवठ्याची डेडलाईन आणखी लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १२ जूनपासून नवीन योजनेतून पाणीपुरवठा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले होते. यापूर्वी नव्या योजनेतील पाण्यावर प्रक्रिया करून एमबीआरमध्ये साठा करण्यात आला होता.
प्रारंभी दोन दिवस २० एमएलडी पाणीपुरवठाही करण्यात आला. मात्र, नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या पाइपलाइनला गळती लागल्यानंतर जीव्हीपीआर कंपनीने दुरुस्तीसाठी शटडाऊन घेतला. त्याचवेळी जायकवाडी धरणातील पाणीपातळी घटल्याने सायफन पद्धतीने पाणी उपशातही अडथळे निर्माण झाले.
यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पर्यायी उपाययोजना म्हणून धरणात अतिरिक्त सबमर्सिबल पंप व व्हॅक्यूम पंप बसवून पाणी उपशाची व्यवस्था सुरू केली. मात्र, त्याचदरम्यान शुक्रवारी मुख्य जलवाहिनीवरील स्कोअर व्हॉल्व्ह निकामी झाल्याने संपूर्ण जलवाहिनी रिकामी करून दुरुस्ती हाती घ्यावी लागली.
सुमारे पाच किलोमीटरची जलवाहिनी रिकामी करण्यासाठी अनेक तास सुरूच होते. दरम्यान दुरुस्तीचे हे काम रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार असून आज शनिवारी सकाळी पंपिंग सुरू करण्याचे नियोजन आहे. तसेच अन्यत्र गळती तर नाही ना, याचीही तपासणी सुरू असल्याने अभियंत्यांची चिंता वाढली आहे.
आज सिडको-हडकोचा पाणीपुरवठा राहणार बंद
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा नवीन पाणीपुरवठा योजनेतील महत्त्वाच्या जोडणी कामांमुळे आज शनिवारी (दि. १३) सिडको आणि हडको परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून मुख्य जलवाहिनीवरील तांत्रिक कामांसाठी १४ तासांचा शटडाऊन घेण्यात येत असून, त्यामुळे संबंधित भागातील नियोजित पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे.
व्यासाच्या नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत १५०० मि.मी. मुख्य गुरुत्वजलवाहिनीवर एन-५ आर-२ आणि एन-५ आर-३ जलकुंभांच्या जोडणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी महापालिका प्रशासनाने मंजुरी दिली असून, सकाळी ७ ते रात्री ९ या कालावधीत १११८ मि.मी. व्यासाच्या एक्सप्रेस मुख्य जलवाहिनीवरील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. याच काळात विश्वभारती आणि गारखेडा जलकुंभांसाठी आवश्यक क्रॉस कनेक्शनची कामेही पूर्ण करण्यात येणार आहेत. केले
भविष्यातील वाढीव पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम आणि सुरळीत करण्यासाठी ही कामे महत्त्वाची मानली जात आहेत. दरम्यान, जलवाहिनी रिकामी करणे, जोडणीची कामे पूर्ण करणे, आवश्यक तपासण्या आणि त्यानंतर पुन्हा जलवाहिनीमध्ये पाणी भरण्याच्या प्रक्रियेसाठी प्रत्यक्ष कामाव्यतिरिक्त आणखी पाच ते सहा तासांचा कालावधी लागणार आहे.
त्यामुळे सिडको आणि हडको परिसराला नियोजित दिवशी पाणीपुरवठा होऊ शकणार नसून, संबंधित भागांचे वेळापत्रक एक दिवसाने पुढे ढकलण्यात आल्याचे मनपा पाणीपुरवठा विभागाकडून कळवण्यात आले आहे. शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठा व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी ही कामे अत्यावश्यक असल्याने नागरिकांनी संयम बाळगून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता वसंत भोये यांनी केले.