Sambhajinagar Crime  pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime : ६.५१ लाखांचा अपहार उघड, फौजदारी कारवाईचे काय ?

वीरगाव-मुर्शदपूर ग्रामपंचायतीतील लाखांच्या अनियमितते प्रकरणी ग्रामस्थांचा सवाल

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर: वैजापूर तालुक्यातील वीरगाव-मुर्शदपूर ग्रामपंचायतीत ६ लाख ५१ हजार ९२९ रुपयांचा अपहार झाल्याचे चौकशीत समोर आले आहे. या प्रकरणात संबंधितांकडून रक्कम वसूल करण्याचे आदेश देण्यात आले असले, तरी अद्याप फौजदारी गुन्हे दाखल झालेले नाहीत. आर्थिक अनियमिततेची रक्कम निश्चित झाल्यानंतर ग्रामपंचायत कायद्यानुसार फौजदारी कारवाई होणे अपेक्षित आहे, असा प्रश्न उपस्थित करत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली आहे.

ग्रामपंचायतीच्या घरपट्टी, नळपट्टी, गाळ्यांची अनामत रक्कम आणि भाड्याच्या पावत्यांमधून जमा झालेला निधी, तसेच ग्रामनिधी, पाणीपुरवठा आणि चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीच्या व्यवहारांत अनियमितता झाल्याची तक्रार आहे. महिला सरपंचांच्या कोऱ्या धनादेशांवर सह्या घेऊन खोटी कागदपत्रे तयार करण्यात आली आणि त्याआधारे शासकीय निधीचा अपहार झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या प्रकरणी समाज सेवा मंचने मुख्य कार्यकारी अधिकारी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार गटविकास अधिकाऱ्यांनी ६ लाख ५१ हजार ९२९ रुपयांची रक्कम वसूल करण्याचे समंधितांवर आदेश दिले आहेत. दरम्यान केवळ रक्कम वसूल करून कारवाई थांबवू नये, अशी मागणी समाज सेवा मंचचे अध्यक्ष राजाराम थोरात, माजी सरपंच प्रभाकर थोरात आणि ग्रामपंचायत सदस्य सखाहारी कदम, रावसाहेब थोरात, दादासाहेब विगे यांनी केली आहे.

संबंधित अधिकारी आणि व्यक्तींची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी मंचच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीवर प्रशासन काय निर्णय घेते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT