Vaijapur Crime News : तरुणाच्या मृत्यूनंतर वैजापुरात तणावपूर्ण शांतता file photo
छत्रपती संभाजीनगर

Vaijapur Crime News : तरुणाच्या मृत्यूनंतर वैजापुरात तणावपूर्ण शांतता

आरोपी २६, अटक एकाला; मिर्झापूर वेब सीरिजलाही लाजवेल असा थरार

पुढारी वृत्तसेवा

Vaijapur : Tense atmosphere in Vaijapur following the death of a youth

वैजापूर पुढारी वृत्तसेवा मिर्झापूर वेब सीरिजमधील टोळीयुद्धाची आठवण करून देणाऱ्या वैजापूरच्या रक्तरंजित संघर्षाने एका तरुणाचा बळी घेतला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रोहित अनिल पठारे (वय २४, रा. वैजापूर) याचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला आणि शहरात तरुणाचे नातेवाईक, मित्र यांच्या संतापाचा उद्रेक रस्त्यावर आला. मध्यरात्रीपासून बुधवारी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मृताचे नातेवाईक आणि मित्र पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसले.' पोलिसांचा थाक आहे की नाही? एवढा भीषण हल्ला होऊनही आरोपी मोकाट का? या सवालांनी १६ तास पोलिस ठाणे दणाणून गेले.

वैजापूरमधील या रक्तरंजित संघर्षांबाबत दै. पुढारीने पहिल्याच दिवशी मिर्झापूर पॅटर्न वैजापुरात या वृत्तातून धोक्याची घंटा वाजवली होती. आरोपी मोकाट असल्याचा मुद्दा उपस्थित करत प्रकरण गंभीर वळण घेण्याचे संकेतही दिले होते. आता रोहितच्या मृत्यूने त्या संघर्षाचे वास्तव समोर आले आहे.

रोहितच्या मृत्यूची बातमी समजताच नातेवाईक आणि मित्रांचा संताप अनावर झाला. मंगळवारी मध्यरात्रीपासून त्यांनी पोलिस ठाण्यात ठिय्या देत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. पोलिस ठाण्यात सुरू असलेल्या या तणावादरम्यान मृताच्या एका मित्राने अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

या प्रकाराने पोलिसांची एकच धावपळ उडाली. पहाटेपर्यंत सुरू असलेल्या या गोंधळानंतर बुधवारी सकाळीही आंदोलक माघार घेण्यास तयार नव्हते. सकाळपासून दुपारी साडेतीन वाजेपर्यंत आरोपी अद्याप मोकाट का? या प्रश्नावरून त्यांनी पोलिसांना धारेवर धरले. वाढता रोष पाहून पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला.

अखेर पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी आरोपींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही, अशी ठाम भूमिका मांडली. त्यानंतर पुन्हा जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, संतप्त नातेवाइकांचा मुख्य सवाल कायम होता. तरुणाचा जीव गेल्यानंतरही सर्व आरोपी पोलिसांच्या हाती का लागत नाहीत.

आंदोलकांचा संताप आणखी वाढला आणि त्यांनी पोलिस ठाण्याबाहेर पडत शहरातील डॉ बाबासाहेब भांबेडकर चौक गाठला तेथे रास्ता रोको सुरू करण्यात आला. काही आंदोलक वाहनांसमोर झोपल्याने वाहतूक ठप्प झाली. तब्बल दीड तास चाललेल्या आंदोलनामुळे वाहनांच्या रांगा लागल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे चौकातील दुकानेही बंद करण्यात आली. शेवटी पोलिसांनी ठाम भूमिका घेत आंदोलकांना विश्वासात घेतल्यानंतर आंदोलक परतले.

अमानुष मारहाण झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

रोहितला झालेली मारहाण अमानुष असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. त्याला घरातून उचलून विविध ठिकाणी नेऊन अमानुष मारहाण करण्यात आली. त्याच्या पायावर दगडाने ठेचल्याचे, तसेच शरीराच्या विविध भागांत स्क्रू ड्रायव्हर खुपसल्याचे त्यांनी सांगितले. रोहित पिण्यासाठी पाणी मागत असताना त्याच्यासोबत अपमानास्पद आणि अमानुष वर्तन करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या आरोपांमुळे घटनेचे गांभीर्य आणखी वाढले आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकारी आलेच नाही

मंगळवारी रात्रीपासून बुधवारी दुपारपर्यंत परिस्थिती तापलेली असताना जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपैकी कोणीही वेळेत घटनास्थळी भेट दिली नसल्याची नाराजी अनेकांनी व्यक्त केली. शहरातील तणाव पाहता जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांचे पोलिस निरीक्षक आणि दंगल नियंत्रण पथक वैजापूरमध्ये तैनात करण्यात आले आहे.

गुन्हेत वाढ

उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. रोहितचा मृत्यू झाल्यानंतर गुन्ह्यात हत्या, अपहरण आणि अॅट्रॉसिटीच्या कलमांची वाढ करण्यात आली आहे. आता एकूण २६ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेची तीन आणि वैजापूर पोलिस ठाण्याची दोन अशी पाच पथके रवाना करण्यात आली आहेत. बुधवारी पहाटे एका आरोपीला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT