कुटुंबीयांचे सांत्वन करून धीर देताना पालकमंत्री संजय शिरसाट, खा. संदीपान भुमरे, आ. रमेश बोरनारे आदी.  (छाया : फैसल पटेल)
छत्रपती संभाजीनगर

Rohit Pathare Case : तुम्हाला मेलेल्या माणसाला अटक करायची होती का ?

वैजापूर हत्याकांड प्रकरणी पालकमंत्री शिरसाटांचे पोलिसांना खडे बोल

पुढारी वृत्तसेवा

वैजापूर : रोहित पठारेच्या हत्याकांड प्रकरणात पोलिसांच्या कार्यपद्धतीने पीडित कुटुंबाचा संताप आणखी वाढविला. शुक्रवारी रोहितच्या घरी सांत्वनासाठी पोहोचलेल्या जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यासमोर कुटुंबीयांनी पोलिसांविरोधात तक्रारींचा पाढाच वाचला. तक्रारींचा तपशील ऐकून शिरसाटही आवाक झाले. त्यांनी उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांना धारेवर धरत तपासातील हलगर्जीपणाचा जाब विचारला. एका माणसाचा जीव गेला तरी तुम्ही परस्परविरोधी गुन्हे बघत बसलात. तुम्हाला मेलेल्या माणसाला अटक करायची होती का ? काय करता तुम्ही असे ? या शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.

फिर्याद देण्यासाठी गेल्यानंतर दोन-दोन दिवस पोलिस ठाण्यात बसवून ठेवले जाते, मात्र गुन्हा नोंदविण्यास दिरंगाई होते, अशा तक्रारी कुटुंबीयांनी केल्या. यावर शिरसाट यांनी पोलिसांना खडे बोल सुनावले. निश्चितपणे तुमच्याकडून हलगर्जीपणा झालेला आहे, हे लक्षात घ्या. फिर्यादी कोण आहे आणि समोरचा कोण आहे, याचा विचार न करता गुन्हा नोंदविणे ही पोलिसांची पहिली ड्युटी आहे. दोन- दोन दिवस फिर्यादीला बसवून ठेवता आणि गुन्हा नोंद करीत नाही, हे काय चालले आहे ?

रोहितचा मृत्यू झाल्यानंतरही पोलिसांनी परस्परविरोधी गुन्ह्यांवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 'एका माणसाचा जीव गेला तरी तुम्ही परस्परविरोधी गुन्हे बघत बसलात. तुम्हाला मेलेल्या माणसाला अटक करायची होती का ? काय करता तुम्ही असे ?' या शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. 'आपल्याला कोणाचीही बाजू घ्यायची नाही. जे सत्य आहे ते समोर आले पाहिजे. तुमची कार्यपद्धती मला माझ्या दृष्टीने योग्य वाटत नाही. पीडित कुटुंबीय सार्वजनिकपणे आरोप करीत आहेत, त्यांच्या भावनाही समजून घेतल्या पाहिजेत, असेही त्यांनी सुनावले.

या प्रकरणात कोणावरही अन्याय न करता सत्याच्या आधारे तातडीने तपास पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. दरम्यान, कुटुंबाला आर्थिक आधार म्हणून पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली. यावेळी खासदार संदीपान भुमरे, आमदार रमेश बोरनारे आणि माजी उपनगराध्यक्ष साबेर खान उपस्थित होते.

दोन गटातील वादात तरुणाने गमावला जीव

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन गटांत किरकोळ वाद झाला होता. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हेही दाखल झाले होते. त्यानंतर ३१ ऑक्टोबरला पुन्हा दोन्ही गटांत संघर्ष उफाळला. यावेळी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. याच संघर्षात रोहित पठारे याला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. त्याच्यावर उपचार सुरू असताना ३ नोव्हेंबरला त्याचा मृत्यू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT