Vaijapur Panchayat Samiti building repair case
नितीन थोरात
वैजापूर : वैजापूर येथील पंचायत समिती इमारतीच्या दुरुस्तीसाठी आमदार रमेश बोरणारे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा नियोजन मंडळामार्फत एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून कार्यालयाची, शासकीय निवासस्थानाची तसेच परिसरातील अनुषंगिक इतर कामांची दुरुस्ती करणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात फक्त शौचालय बांधण्यात आले असून, तेही अपूर्ण अवस्थेत आहे. उरलेल्या कामाचा दर्जी अत्यंत निकृष्ट असल्याच्या तक्रारी कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे केली आहे. या तक्रारी अधिकारी दखल घेतात का याकडे लक्ष लागून आहे.
एकेकाळी मराठवाड्यात नावाजलेली पंचायत समिती म्हणून वैजापूर पंचायत समितीची ओळख होती. स्व. आर. एम. वाणी यांच्या प्रयत्नातून लाखो रुपयांमध्ये ही शासकीय इमारत उभी राहिली होती. आता त्याच इमारतीच्या दुरुस्तीसाठी नियोजनसमितीकडून १ कोटींचा निधी मिळाला. यातून इमारतीत केवळ रंगरंगोटी व थातूरमातूर ठिगळ लावण्यात आली आहेत.
काही भागांचे प्लास्टर पडले असून, काही खिडक्या फुटलेल्या स्थितीत आहेत. लोखंडी ग्रीलही खाली पडले आहे. याउलट, बांधकाम विभाग या कामाला उत्कृष्ट दर्जी देत असल्याचा दावा करत आहे. विशेष म्हणजे, कर्मचारी सातत्याने आवाज उठवत असूनही बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी थेट पंचायत समितीचे प्रमुख यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
यामुळे कोटी रुपयांचा निधी खर्च करून केवळ रंगरंगोटी केली जात असेल आणि गुणवत्तापूर्ण दुरुस्ती न होत असल्यास, ठेकेदार फक्त शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारत असल्याचे चित्र स्पष्ट होते. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराची तातडीने दखल घेऊन योग्य ती चौकशी आणि कारवाई करावी, अशी मागणी कर्मचारी करत आहेत.
पंचायत समितीमधील शासकीय निवासस्थानाच्या दुरुस्ती कामाबाबत निवासस्थानातील कर्मचाऱ्यांनी कामाचा दर्जी आणि अनुषंगिक कामांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत संबंधित विभागाला अवगत करण्यात आले आहे.- डॉ. श्रीकृष्ण वेणीकर, बीडीओ, वैजापूर पंचायत समिती
या शासकीय निवासस्थानांमध्ये बांधकाम विभागासह इतर कर्मचारीही वास्तव्यास आहेत. हे काम ठेकेदाराकडून दर्जेदार पद्धतीने करून घेणे ही कर्मचाऱ्यांच्या हिताची वाव आहे. मात्र, जर अशा इमारतींमध्येच थातूरमातूर काम होत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांना मिळणाऱ्या योजनेतील इतर सुविधांचे काय? असा प्रश्न उपस्थित होत.