MSEDCL worker death
वैजापूर : महानगरपालिकेच्या निकालांची धामधूम सुरू असतानाच एक धक्कादायक दुर्घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरात विद्युत खांबावर दुरुस्तीचे काम करत असलेल्या कर्मचाऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना वैजापूर शहरातील बीएसएनएल कार्यालयाच्या परिसरात घडली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कर्मचारी विद्युत खांबावर चढून तांत्रिक काम करत असताना अचानक त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. यात तो गंभीर जखमी झाला आणि घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. वैजापूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह, रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली आहे. संबंधित कर्मचारी कोणत्या विभागाचा होता? तसेच दुर्घटना नेमकी कशामुळे घडली? याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, त्या दुर्घटनेनंतर सुरक्षा साधनांचा अभाव, कामगारांना दिली जाणारी संरक्षण साधने आणि प्रशासनाची जबाबदारी यावरही प्रश्न उपस्थित होत आहे. घटनास्थळी मोठी गर्दी जमली आहे.