छत्रपती संभाजीनगर : घराच्या नवीन वीज जोडणीसाठी ५ हजार रुपयांची लाच घेताना महावितरणच्या खंडाळा (ता. वैजापूर) उपकेंद्रातील कनिष्ठ अभियंता आणि एका वायरमनला जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि. ८ सप्टेंबर) दुपारी वैजापूर तालुक्यातील मौजे बिलोनी येथे करण्यात आली.
महावितरण उपकेंद्र, खंडाळा येथील कनिष्ठ अभियंता नवनाथ दादा बेळे (५०, रा. फुलेवाडी रोड, वैजापूर) आणि वायरमन महेश शंकर पाडोळे (२६, रा. लक्ष्मीनगर, खंडाळा, ता. वैजापूर) अशी आरोपींची नावे आहेत.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, ३८ वर्षीय शेतकरी तक्रारदाराने १ सप्टेंबर रोजी घराच्या नवीन वीज कनेक्शनसाठी महावितरणकडे ऑनलाइन अर्ज केला होता. या अर्जाच्या अनुषंगाने ते ५ सप्टेंबर रोजी खंडाळा उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता नवनाथ बेळे यांना भेटले. त्यावेळी बेळे यांनी वीज कनेक्शन देण्यासाठी ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने ७ सप्टेंबर रोजी थेट जालना 'एसीबी'कडे लेखी तक्रार दिली. पथकाने ७ तारखेलाच या तक्रारीची पडताळणी केली. यात अभियंता नवनाथ बेळे याने ५ हजारांची मागणी करून, ती रक्कम वायरमन महेश पाडोळे याच्याकडे देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, मंगळवारी (दि. ८) एसीबीने सापळा रचला.
वायरमन पाडोळे हा तक्रारदाराच्या मौजे बिलोनी (गट क्र. २१) येथील घरी नवीन वीज कनेक्शन जोडणीसाठी आला असता, त्याने पंचांसमक्ष ५ हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्याच क्षणी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई एसीबीच्या पोलिस अधीक्षक माधुरी केदार कांगणे, अपर अधीक्षक शशिकांत सिंगारे, जालना एसीबीचे उपअधीक्षक बी. एस. जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे, अतीश तिडके, गजानन खरात, अशोक राऊत, गजानन कांबळे आणि संदीप लहाने यांच्या पथकाने केली.