Vaijapur: Minister Vikhe Reprimands Employees in the Nandur Madhmeshwar Division
नितीन थोरात
वैजापूर : पुढारी वृत्तसेवा ‘गोदा ते नर्मदा – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा’ दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाच्या वतीने सुरू झाली असून सोमवारी (२७) दुपारच्या सुमारास ही यात्रा वैजापूर शहरात दाखल झाली. यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यात्रेची माहिती देत, जल यात्रेविषयी सखोल माहिती दिली. नंतर मात्र मंत्री विखे पाटील यांनी नांदूर मधमेश्वर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
“अधिकारी-कर्मचारी कार्यालयात वारंवार दिसत नाहीत. आपल्या विभागातील कॅनॉल किती किलोमीटरचा आहे, याची साधी माहितीही सांगता येत नाही. आपण लोकांच्या सेवेसाठी आहोत, लोक आपल्या सेवेसाठी नाहीत, याचे भान ठेवा,” अशा शब्दांत विखे यांनी सुनावले. तसेच या सर्व बाबींचा उद्यापर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
पुढारीच्या बातमीचे कात्रण ठरले निर्णायक.
दरम्यान, नांदूर मधमेश्वर विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीबाबत दैनिक ‘पुढारी’ ने वेळोवेळी बातम्यांची मालिका प्रसिद्ध केली होती. संबंधित अधिकाऱ्यांकडून वारंवार सूचना देण्याची आश्वासने दिली जात होती; मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नव्हती.
तालुक्यातील काही लोकप्रतिनिधींनी ‘पुढारी’ मधील बातम्यांचे कात्रण थेट मंत्री विखे यांना दाखवत संबंधितांच्या कामकाजाची वस्तुस्थिती मांडली. यानंतरच विखे यांनी आपल्या भाषणातून संबंधितांवर थेट टीका करत प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला.
भर सभेत शेतकऱ्याचा गंभीर आरोप बोगस कामांवर बोट.
ही जलयात्रा वैजापूरात दाखल होताच मंचावर मान्यवरांची भाषणे झाली. मात्र मंत्री राधाकृष्ण विखे भाषणासाठी उभे राहिल्यावर, मागील रांगेतून उभा राहिलेल्या एका शेतकऱ्याने थेट आरोपांचा भडीमार करत नागरिकांचे लक्ष वेधले. “ठेकेदारांकडून बोगस कामे केली जात आहेत, खोटी बिले रेकॉर्ड केली जात आहेत, जुने कामे कागदावर दाखवली जात आहेत. कोट्यवधी रुपयांचा अपव्यय होतोय; पण आमच्या बांधावर पाणी अजूनही पोहोचलेलं नाही,” असा संतप्त सवाल त्या उपस्थित शेतकऱ्याने उपस्थित केला.