नितीन थोरात
वैजापूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भाजपा व शिवसेनेने युती जाहीर केल्यानंतर वैजापूर तालुक्यात तीव्र असंतोष पाहायला मिळत आहे. युतीच्या घोषणेनंतर वैजापूर शहरात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत “युती तोडा, युती तोडा” अशा घोषणा दिल्या. विशेष म्हणजे, ही घोषणाबाजी थेट राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना, कार्यकर्त्यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर वैजापूर तालुक्यात भाजपाने स्वतंत्र आघाडी उभारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.
तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये युतीबाबत अंतर्गत चर्चा सुरू असून, जर युती तुटली नाही तर भाजप पुरस्कृत सर्वच जागांवर उमेदवार उभे करण्याचा ठाम निर्णय कार्यकर्त्यांनी घेतल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे.
युतीमुळे स्थानिक कार्यकर्त्यांचा हिरमोड झाल्याची भावना उघडपणे व्यक्त होत असून, वैजापूर तालुक्यातील राजकीय समीकरणे दिवसेंदिवस बदलताना दिसत आहेत. याबाबत पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.