अन्न व औषध प्रशासनाचे कर्मचारी दुकान सील करताना. (इन्सेट) कचोरीत दिसत असलेली उंदराची विष्टा  pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Vaijapur Food Safety : स्वच्छतेचा बोजवारा? कचोरीत आढळली उंदराची विष्टा; प्रशासनाकडून दुकान सील!

नागरिकांनी दुकान बंद पाडल्यानंतर एफडीएची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

वैजापूर : शहरातील खाद्यपदार्थांच्या दुकानांमधील स्वच्छता आणि गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. डेपो रोड परिसरातील भवानी राजस्थान स्वीट्स या दुकानातून खरेदी केलेल्या कचोरीमध्ये चक्क उंदराची विष्टा आढळल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी सायंकाळी (२३) समोर आला आहे. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त करत दुकान बंद पाडले, ज्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने हे दुकान आणि संबंधित किचन सील केले आहे. मात्र, ऑनलाईन तक्रार करूनही प्रशासनाचे पथक उशिरा पोहोचल्याचे नागरिकांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, एका ग्राहकाने रविवारी सायंकाळी भवानी राजस्थान स्वीट्समधून कचोरी खरेदी केली होती. त्या कचोरीमध्ये उंदराची विष्टा आढळताच ग्राहकाने दुकानात जाऊन जाब विचारला आणि तीव्र संताप व्यक्त केला. ही माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी दुकानाबाहेर मोठी गर्दी केली.

संतप्त नागरिकांनी पुढाकार घेत दुकान तातडीने बंद पाडले. एका नागरिकाने या घटनेबाबत अन्न व औषध प्रशासनाकडे ऑनलाईन तक्रार नोंदवली होती. मात्र, नागरिकांनी दुकान बंद केल्यानंतर एफडीएचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

या घटनेमुळे शहरातील खाद्यपदार्थ विक्रेते आरोग्याच्या आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन करतात का, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आता एफडीएच्या पुढील तपासणीत नेमके काय निष्पन्न होते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

किचनची पाहणी आणि सीलची कारवाई

एफडीएच्या पथकाने दुकानात दाखल होत पंचनामा आणि तपासणी सुरू केली. दुकानापासून काही अंतरावर दुकानमालकाचे स्वतंत्र किचन असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने तिथेही धाड टाकली. किचनमधील अस्वच्छता, साठवणूक व्यवस्था आणि इतर बाबींची पाहणी केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने भवानी राजस्थान स्वीट्सचे दुकान तसेच किचनमधील संबंधित भाग पूर्णपणे सील केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT