वैजापूर : तालुक्यातील शेतकरी व नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी बुधवारी आयोजित करण्यात आलेला जनता दरबार अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बैठकीत अडकल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दुपारी 3 वाजताची वेळ देण्यात आली असतानाही प्रत्यक्ष प्रक्रिया सायंकाळी 5 वाजल्यानंतर सुरू झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सभागृहाबाहेर घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. यामुळे काही वेळ निर्माण झालेली तणावची परिस्थिती पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.
स्थानिक प्रशासनाने बुधवारी पंचायत समिती कार्यालयात जनतादरबाराचे आयोजन केले होते. त्यानुसार दुपारपासूनच शेकडो शेतकरी व नागरिक आपल्या तक्रारींसह उपस्थित होते. जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. हे वेळेतच दाखल झाले; मात्र सुरुवातीलाच त्यांची अंतर्गत बैठक सुरू झाली. ही बैठक तब्बल दोन तास चालल्याने नागरिकांना बाहेरच तातकळत राहावे लागले.
वेळ वाढत गेल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली. शेतीशी संबंधित तातडीच्या प्रश्नांसाठी दूरवरून आलेल्या नागरिकांचा पूर्ण दिवस प्रतीक्षेत गेला. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सभागृहाबाहेर घोषणाबाजी केली. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक आटोपून जनतादरबारास सुरुवात केली व उपस्थित नागरिकांच्या तक्रारी ऐकून संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम. यांचीही उपस्थिती होती.
नियोजनात त्रुटी
दरम्यान, जनतादरबाराबाबत स्थानिक प्रशासनाने लोकप्रतिनिधींना माहिती न दिल्याची बाबही समोर आली असून, अधिकाऱ्यांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होऊ नयेत, यासाठीच त्यांना दूर ठेवण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. एकूणच, नियोजनातील त्रुटींमुळे प्रशासनावर टीकेची झोड उठत आहे.
जनता दरबार केवळ औपचारिकता
याप्रसंगी सुरुवातीच्या विलंबामुळे अनेकांना आपली मते मांडण्यासाठी मर्यादित वेळ मिळाल्याची खंत व्यक्त करण्यात आली. जनतादरबार केवळ औपचारिकता ठरत आहे का? असा सवालही यावेळी उपस्थित झाला. याकडे प्रशासनाने गांभिर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे आहे.