वैजापूर : हक्काच्या पाण्यासाठी वारंवार निवेदने, मोर्चे आणि आमरण उपोषण करूनही ठोस निर्णय होत नसल्याने शेतकऱ्यांचा संयम शनिवारी सुटला. वैजापूर आणि गंगापूर तालुक्यांसाठी नांदूर-मधमेश्वर कालव्यातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी महिला आंदोलकांनी जांबरगाव हद्दीत समृद्धी महामार्गावर ठिय्या दिला.
तब्बल अडीच तास चाललेल्या या आंदोलनात अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतरही तोडगा निघाला नाही. आंदोलकांनी महामार्गावर ठिय्या देण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या झटापटीत चिंचडगाव येथील शेतकरी अनिल काळे जखमी झाले. पोलिसांनी डोक्यात लाठी मारल्याचा आरोप त्यांनी केला.
रब्बी हंगामातील पिके वाचविण्यासह पिण्याच्या पाण्यासाठी नांदूर-मधमेश्वर कालव्यातून पाणी सोडावे, अशी मागणी आधार जलदूत समितीचे पंडित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे. यासाठी २७ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.
मात्र, ठोस निर्णय न झाल्याने त्याच दिवशी सायंकाळपासून कालवा विभागाच्या कार्यालय परिसरात शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले. प्रशासनाकडून वारंवार निवेदने देऊनही निर्णय होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. त्यामुळे शनिवारी महिला आंदोलकांनी थेट समृद्धी महामार्ग गाठला.
जांबरगाव हद्दीत दुपारी बाराच्या सुमारास महिला आंदोलक महामार्गाच्या एका बाजूला जमून ठिय्या देऊ लागल्या. उपविभागीय दंडाधिकारी डॉ. अरुण जन्हऱ्हाड, तहसीलदार सुनील सावंत आणि पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, पाणी कधी सोडणार, याचा स्पष्ट निर्णय द्यावा, या मागणीवर महिला ठाम राहिल्या.
जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता सुनंदा जगताप आणि अधीक्षक अभियंता राजेंद्र धोडपकर यांनीही आंदोलकांशी चर्चा केली. २ नोव्हेंबर रोजी बैठक घेऊन पाणी सोडण्याबाबत सविस्तर चर्चा व नियोजन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. मात्र, प्रत्यक्ष पाणी सोडण्याची तारीख जाहीर न झाल्याने आंदोलकांनी माघार घेण्यास नकार दिला.
चर्चेतून मार्ग निघत नसल्याने आंदोलकांनी महामार्गाच्या संपूर्ण रस्त्यावर ठिय्या देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना रोखून ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे आणि सदस्य पंकज ठोंबरे यांनी आंदोलकांना जबरदस्तीने ताब्यात घेऊ नये, अशी विनंती केली. मात्र, कारवाईदरम्यान गर्दी वाढल्याने महामार्गावर गोंधळ निर्माण झाला.
पोलिसांचा बंदोबस्त भेदून महिला समृद्धीवर
समृद्धी महामार्गावर आंदोलन होऊ नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. महामार्गाच्या इन-आऊट पॉइंटवर छावणीसदृश व्यवस्था होती. प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात होती. मात्र, एवढ्या मोठ्या बंदोबस्तालाही चकवा देत महिला आंदोलक महामार्गावर पोहोचल्या. विशेष म्हणजे, चार ते पाच किलोमीटर पायी प्रवास करून महिला एकत्र आल्या आणि थेट महामार्गावर ठिय्या दिला. त्यामुळे पोलिसांच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
समृद्धी महामार्गावर आंदोलन करण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यामुळे आंदोलकांना रोखण्यासाठी महामार्गाच्या प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एवढ्या मोठ्या यंत्रणेला महिला आंदोलकांनी सहज चकवा कसा दिला? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. पाण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनापेक्षा पोलिसांच्या बंदोबस्ताची चर्चा अधिक रंगू लागली आहे.
पोलिसांच्या लाठीहल्ल्यात शेतकरी जखमी; रुग्णालयात उपचार
महिला आंदोलकांना ताब्यात घेताना चिंचडगाव येथील शेतकरी अनिल काळे यांनी हस्तक्षेप केला. महिलांना अशा प्रकारे का ताब्यात घेतले जात आहे, असा सवाल त्यांनी पोलिसांना केला. यानंतर त्यांनाही ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला. यावेळी पोलिसांनी डोक्यात लाठी मारल्याचा आरोप काळे यांनी केला. त्यांच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्राव झाला. पोलिसांनी त्यांना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला; मात्र ते पोलिसांसोबत जाण्यास तयार नसल्याने पंकज ठोंबरे यांनी त्यांना वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
निर्णय घ्या; उपोषण सुरूच ठेवणार !
उपोषणस्थळी परतल्यानंतर पंडित शिंदे यांनी प्रशासनाने केवळ बैठकीचे आश्वासन न देता नांदूर-मधमेश्वर कालव्यातून पाणी सोडण्याची निश्चित तारीख जाहीर करावी, अशी मागणी केली. रविवारी दुपारी बारापर्यंत ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.