Vaijapur faces thirst in the midst of winter; 38 tanker trips made, 17 villages still waiting
फैसल पटेल
वैजापूर : यंदा पावसाने हात आखडता घेतल्याने त्याचे गंभीर परिणाम आता गावागावांत जाणवू लागले आहेत. हिवाळा आताच सुरू झाला तरी तालुक्यातील २५ गावांवर टँकरने पाणी पिण्याची वेळ आली आहे. ३३ टँकरच्या दररोज ३८ खेपांमधून गावकऱ्यांची तहान भागवली जात आहे. क्षमतेनुसार दररोज किमान ४ लाख ५६ हजार ते कमाल ९ लाख १२ हजार लिटर पाण्याची वाहतूक होत आहे. आणखी १७ गावांनी टँकरची मागणी केली असून, २७ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पाण्यासाठी अशी वणवण सुरू असेल, तर पुढील दिवस कसे काढायचे, असा प्रश्न गावकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ सहायक संजय राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या लोणी बु., कनकसागज, मकरमतपूर, तिडी, संवदगाव, पाराळा, बल्लाळीसागज, पानवीखंडाळा, बिलोणी वस्ती, करंजगाव, भायगाव वैजापूर, खंडाळा, लाखखंडाळा, वडजी, आघूर, भिवगाव, अगरसायगाव, अमानतपूरवाडी, बोरसर, टुणकी-दसकुली, जरूळ, पेंडेफळ, शिवगाव, पाथ्री आणि रघुनाथपूरवाडी या २५ गावांना ३३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
या टँकरच्या दररोज ३८ खेपा होत असून, १२ हजार आणि २४ हजार लिटर क्षमतेच्या टँकरचा वापर केला जात आहे. त्यामुळे दररोज लाखो लिटर पाणी गावागावांत पोहोचवावे लागत आहे. सध्या टँकरच्या पाण्यावर गावकऱ्यांचे दिवस ढकलले जात आहेत. महिलांना हंडा-कळशी घेऊन पाण्यासाठी दाहीदिशा भटकावे लागू नये, यासाठी प्रशासनाने आतापासूनच ठोस नियोजन करणे गरजेचे आहे. शेतात पीक नाही, घरात पाणी नाही आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचीही चिंता आहे. पावसाने पाठ फिरवल्याने गावकऱ्यांच्या जगण्यावरच पाण्याचे संकट ओढवले आहे.
प्रस्ताव दाखल
दरम्यान, एकोडीसागज, झोलेगाव, चोरवाघलगाव, शिवराई, मिरकनगर, माळीसागज, शिऊर, खरज, भिंगी, नालेगाव, साफियाबादवाडी, धोंदलगाव, कनकसागज, अंचलगाव, अलापूरवाडी, बाभुळगाव बु. आणि बाजाठाण या १७ गावांचे टँकर प्रस्ताव मंजुरीसाठी आले आहेत. त्यामुळे टँकरवर अवलंबून असलेल्या गावांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.