वैजापूर : जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी नाम निर्देशनपत्र भरण्याची प्रक्रिया सोमवारी सुरु असताना येथील पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात एका इच्छुकाने सोमवारी गोंधळ घालत निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अरुण जऱ्हाड व निवडणूक कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. तसेच अरेरावीची भाषा करत टेबलवरील नाम निर्देशन पत्रांचा चुरगळा करून या पत्राना धोका निर्माण होईल असे वर्तन केले. तुला पाहून घेतो अशी धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणला अशी फिर्याद डॉ जऱ्हाड यांनी जामगाव येथील बाळासाहेब बनसोडे यांच्या विरोधात पोलिसात दिली.
या फिर्यादीनुसार, सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अरुण जऱ्हाड, निवडणूक कामी नेमलेले विष्णू बिरेवाड, अमोल घुसळे, अशोक म्हस्के, नरेश आडेपवार फोटोग्राफर शांताराम मगर व ईतर नाम निर्देशन पत्र स्वीकारण्याचे काम करत होते. दुपारी तीन वाजेच्या सुमारास बाळासाहेब बनसोडे हा नाम निर्देशन कक्षात आला व त्याने निवडणूक निर्णय अधिकारी डॉ जऱ्हाड यांना उद्देशून तुम्ही आम्हाला नाम निर्देशन पत्राची व्यवस्था व्यवस्थित केली नाही असे म्हणत सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध अरेरावीची भाषा केली.नाम निर्देशनाचे महत्वाचे काम सुरु आहे याची जाणीव करून देऊनही त्याने गोंधळ घालत सरकारी कामात अडथळा आणला.
यामुळे तहसीलच्या निवडणूक विभागाल एकच खळबळ उडाली होती. अधिकाऱ्यांना अरेरावीची भाषा करणाऱ्याविरोधात कर्मचाऱ्यांनी यावेळी संताप व्यक्त केला. निवडणूक निर्णय अधिकारी अरूण जऱ्हाड यांनी याबाबत वैजापूर पोलिस ठाणे गाठत बाळासाहेब बनसोडे याच्या विरोधात तक्रार दाखली केली.
दोन बाऊन्सर सोबत घेऊन गोंधळ
याशिवाय 18 जानेवारीलाही बनसोडे हा दोन बाऊन्सर सोबत घेऊन निवडणूक कक्षात आला व त्याने तहसीलदार सुनील सोबत यांच्यासोबत गोंधळ घातला. तुम्ही नाम निर्देशन पत्राची किंमत 100 रुपये का ठेवली अशी विचारणा त्याने अधिकाऱ्यांना केली होती असे फिर्यादीत म्हंटले आहे.