Chhatrapati Sambhajinagar devotees stranded Uttarakhand
छत्रपती संभाजीनगर : उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी येथे मंगळवारी (दि.५) ढगफुटी होऊन मोठा हाहाकार उडाला. घरे, वाहने वाहून गेली. त्यामुळे अनेक ठिकाणचे रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून दर्शनासाठी गेलेले १८ भाविक उत्तराखंडमध्ये अडकल्याची प्राथमिक माहिती आहे. जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून या भाविकांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे.
उत्तराखंडमध्ये मंगळवारी गंगोत्री नदी किनार्यावर अचानक ढगफुटी होऊन महापूर आला. यामध्ये शेकडो लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून उत्तराखंडमध्ये दर्शनासाठी गेलेल्या भाविकांची माहिती संकलित केली जात आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील अठरा भाविक उत्तराखंडमध्ये अडकल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाले आहे. या भाविकांची नावे, त्यांची सद्यस्थिती याची माहिती मिळविण्यात येत असून त्यांना परत आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मदतही करण्यात येत आहे.
उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात मंगळवारी ढगफुटीमुळे हाहाकार उडाला. मंगळवारी (दि. ५ ऑगस्ट) दुपारी १:४५ वाजता उत्तरकाशीतील हर्सिल येथील भारतीय लष्कराच्या कॅम्पपासून सुमारे ४ किमी अंतरावर धराली गावात ढगफुटी झाली. यामुळे भूस्खलन होऊन किमान ४ जणांचा मृत्यू झाला. तर सुमारे ५० लोक बेपत्ता आहेत. ढगफुटी आणि भूस्खलनामुळे पवित्र गंगोत्री धामशी संपर्क तुटला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे पाण्यासोबत मातीचा ढिगारा सगळीकडे पसरला आहे. आर्मी आणि एनडीआरएफ पथके बचावकार्यासाठी तत्काळ घटनास्थळी रवाना झाली.