छत्रपती संभाजीनगर : मुख्य बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत दागिने, पॉकेट चोरीच्या घटना घडत आहेत. आता यासाठी चोरटे अल्पवयीन मुला-मुलींचा वापर करत असल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.१) समोर आली आहे. अधिकारी आणि सुरक्षारक्षकांनी सतर्कता बाळगत एक मोबाईल चोरटा आणि दोन अल्पवयीन मुलींना पोलिसांच्या स्वाधीन केले.
बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत प्रवासी हेरणारे अनेक जण येथे फिरत असतात. सुरक्षारक्षक आणि अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अनेक चोरट्यांना रंगेहाथ पकडून क्रांती चौक पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. वारंवार त्यांचे नाव पोलिसांत जात असल्याने या चोरट्यांनी आता अल्पवयीन मुला-मुलींना यात सहभागी करून घेतल्याची माहिती सोमवारी ताब्यात घेतलेल्या दोन अल्पवयीन मुलींमुळे समोर आली आहे. सोमवारी सकाळी एक मोबाईल चोरटा आणि दोन अल्पवयीन मुली सुरक्षारक्षक आणि अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता, त्या मुलींकडे ब्लेड आढळून आल्या. चोरट्यांनी हा नवा फंडा काढल्याने यांचा म्होरक्या कोण आहे हे शोधून काढणे म्हत्वाचे आहे. अन्यथा बसस्थानकांवर येणाऱ्या दिवसांत चोर्यांचे प्रमाण वाढण्याची भिती प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.