Unclean bus stand: Transport Minister slams officials
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सिडको बसस्थानकांवरील अस्वच्छता पाहून परिवहन मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच झापले असून, बसस्थानकांवर प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा देण्याचे काम एसटी प्रशासनाचे आहे. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी (दि. १५) दिले.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सरनाईक यांनी शहरातील सिडको बसस्थानकाला भेट दिली. यावेळी त्यांनी बसस्थानकातील विविध सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. सार्वजनिक प्रसाधनगृहाची पाहणी करताना तेथील अस्वच्छता, अपुरी देखभाल तसेच कर्मचाऱ्यांचा अभाव त्यांच्या निदर्शनास आला. याबाबत प्रवाशांकडूनही तक्रारी प्राप्त झाल्याने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. मूलभूत कर्तव्याकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच देखरेखीत कसूर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
विभाग नियंत्रकांना कारणे दाखवा नोटीस
बसस्थानकावरील प्रसाधनगृहातील अस्वच्छता, कामात हलगर्जीपणा आणि एकंदर प्रवाशांना मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यामध्ये दाखवलेली उदासीनता याबद्दल विभाग नियंत्रक व संबंधित आगार व्यवस्थापक यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी. तसेच पुढील ७ दिवसात या संदर्भात तातडीने अहवाल द्यावा असे निर्देश परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना दिलेले आहेत.
कागदावर स्वच्छता नको
प्रवाशांच्या सेवेत असलेली लालपरी केवळ प्रवासाचे साधन नसून महाराष्ट्राच्या जनजीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे एसटीच्या प्रत्येक बसस्थानकावर प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण मिळालेच पाहिजे. यासाठी प्रशासनाने केवळ कागदोपत्री कार्यवाही न करता प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करावे. प्रवाशांच्या सुविधांमध्ये हलगर्जीपणा नको, जबाबदारी निश्चित करा आणि तातडीने सुधारणा करा असा स्पष्ट संदेश एसटी प्रशासनाला दिला आहे.