Accident News : दुभाजकावर दुचाकी आदळून जालन्याचे दोन तरुण ठार file photo
छत्रपती संभाजीनगर

Accident News : दुभाजकावर दुचाकी आदळून जालन्याचे दोन तरुण ठार

जालन्याहून खुलताबादच्या उरुसाला निघाले, पण वाटेतच गाठले काळाने हुल दिल्याने दुचाकी दुभाजकावर आदळली; क्रांतीचौक उड्डाणपुलावरील घटना

पुढारी वृत्तसेवा

Two youths from Jalna killed after their two-wheeler crashed into a road divider

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : खुलताबाद येथील उरुसासाठी अतिशय उत्साहाने निघालेल्या जालन्यातील तरुणांच्या दुचाकीला क्रांती चौक उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला. एका अज्ञात वाहनाचा किरकोळ धक्का लागल्याने तिघेही रस्त्यावर कोसळले. आणि दुभाजकावर धडकल्याने गंभीर जखमी दोघांचा मृत्यू झाला. तर एक जण सुदैवाने बचावला आहे. हा अपघात बुधवारी (दि.२६) दुपारी क्रांतीचौक उड्डाणपूल उतरताना चुन्नीलाल पेट्रोलपंपाजवळ घडला.

परवेज अफसर शेख (१७) आणि समीर शागीर शहा (२०) अशी मृतांची नावे आहेत तर, अर्शद मजार शहा (१७, तिघेही रा. शास्त्री मोहल्ला, जालना) हा गंभीर जखमी असून त्याच्या डोक्याला जखम असल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्रीनिवास रोयलावार यांनी दिली.

ईद-ए-मिलादच्या निमित्ताने खुलताबाद येथे भरणारा मोठा उरूस पाहण्यासाठी जालन्यातील शास्त्री मोहल्ला भागातील ६ ते ७ जिवलग मित्रांनी एकत्र वर्गणी गोळा करून जाण्याचे नियोजन केले होते. दुपारी १२ वाजेच्या सुमारास हे सर्व मित्र ३ ते ४ दुचाकींवरून खुलताबादकडे जाण्यासाठी निघाले.

परवेज, समीर आणि अर्शद हे तिघे एकाच दुचाकीवर स्वार होते. क्रांती चौक उड्डाणपूल उतरत असताना चुन्नीलाल पेट्रोलपंपाजवळ एका वाहनाचा त्यांच्या गाडीला किरकोळ स्पर्श झाला. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी दुभाजकाला धडकून तिघेही दुचाकीवरून थेट रस्त्यावर कोसळले. यावेळी परवेज आणि समीर या दोघांच्या डोक्याला व अन्य ठिकाणी जबर मार लागल्याने दोघे गंभीर जखमी झाले. अर्शद विरुद्ध दिशेला फेकल्या गेल्याने त्याचा जीव वाचला. मात्र त्याच्या डोक्यालाही गंभीर मार लागला आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांना मित्रांनी तातडीने घाटीत नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

कुटुंबांचा आधार हिरावला

मृत्यू झालेला परवेज अवघ्या १७ वर्षांचा असला तरी तो त्याच्या कुटुंबाचा मुख्य आधार होता. त्याचे वडील मिस्त्री काम करत असत, पण दुर्धर आजारामुळे ते सध्या अंथरुणाला खिळून आहेत. तीन बहिणी आणि आजारी आई-वडील अशी संपूर्ण जबाबदारी परवेज मजुरी करून पेलत होता. तो आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. दुसरीकडे, समीरच्या कुटुंबाची परिस्थितीही अत्यंत हलाखीची आहे. त्याचे वडील हमाली करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्याला तीन बहिणी आणि दोन भाऊ आहेत. या दोन्ही गरीब कुटुंबांवर अचानक हा दुःखाचा डोंगर कोसळल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

ईद-ए-मिलादच्या दिवशीच काळाचा घाला

जालना येथील परवेझ आणि समीर दोघे अन्य मित्रांसोबत आनंदाने ईद-ए- मिलादचा सण साजरा करून खुलताबाद येथील ऊरूसासाठी दुचाकीने निघाले होते. मात्र संभाजीनगर येथील क्रांती चौक उड्डाणपुलावर काळाने त्यांच्यावर घाला घातला. ईद-ए- मिलादच्या दिवशीच आणि एकाच गल्लीतील दोन्ही जिवलग मित्रांच्या अशा अपघाती मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT