छत्रपती संभाजीनगर

Drowning Incident | पैठण येथील नाथसागर धरणात दोन तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू!

छत्रपती संभाजीनगरहून आले होते ७ मित्र, रील्स आणि फोटो काढण्याचा आनंद बेतला जीवावर

पुढारी वृत्तसेवा

पैठण : पैठण येथील नाथसागर धरणाच्या पाण्यात छत्रपती संभाजीनगर येथून पोहण्यासाठी आलेल्या सात मित्रांपैकी दोन जण बुडून मृत्यू पावल्याची दुर्दैवी घटना रविवारी (३१ मे) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. संकेत सिद्धार्थ खरात (वय १८ वर्ष) आणि अनिकेत मनू भारती (वय १९ वर्ष, दोघेही रा. अंबिकानगर, गल्ली नंबर ७, मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर) अशी बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. यातील संकेत खरात याचा मृतदेह शोधण्यात यश आले असून, अनिकेतचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही.

छत्रपती संभाजीनगर येथील मुकुंदवाडी परिसरातील सात मित्रांनी वाढत्या उन्हामुळे थंड पाण्याच्या ठिकाणी जाऊन पोहण्याचा प्लॅन केला होता. त्यानुसार रविवारी दुपारी अडीच वाजता हे सर्वजण एका ऑटो रिक्षाने पैठण येथे आले. सायंकाळी पाचच्या सुमारास नाथसागर धरणावर पोहोचल्यावर धरणाच्या पाण्यासोबत रील्स आणि फोटो काढण्यात सर्व मित्र मग्न झाले.

काही वेळाने यातील पाच मित्र पाण्यामध्ये पोहण्यासाठी उतरले. पोहता येत नसतानाही संकेत खरात आणि अनिकेत भारती हे दोघेही पाण्यात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही खोल पाण्यात बुडू लागले. हे लक्षात येताच इतर मित्रांनी वाचवण्यासाठी एकच आरडाओरडा केला. धरणावर आलेल्या पर्यटकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.

घटनेची माहिती मिळताच पैठणचे पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या सूचनेवरून सपोनि चंद्रकांत पवार, पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग, जमादार राजेंद्र जिवडे आणि भाऊसाहेब तांबे यांचे पथक तात्काळ दाखल झाले. नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिक जीवरक्षकांच्या मदतीने पाण्यात शोधकार्य सुरू केले. शोध मोहिमेदरम्यान संकेत खरात याचा मृतदेह जवानांच्या हाती लागला. तो शवविच्छेदनासाठी पैठण येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. अंधार पडल्याने रविवारी रात्री अनिकेत भारती याचा शोध घेता आला नाही. त्यामुळे हे शोधकार्य थांबवण्यात आले होते. आज, सोमवार (१ जून) सकाळी पुन्हा शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे.

"धरणावर दुर्घटना घडल्याची माहिती मिळताच दोन्ही तरुणांच्या नातेवाईकांनी छत्रपती संभाजीनगरहून थेट पैठण धरणावर धाव घेतली. आपल्या पोटच्या गोळ्याचा बुडून मृत्यू झाल्याचे समजताच पालकांनी आणि नातेवाईकांनी धरणाच्या काठावर केलेला आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT