छत्रपती संभाजीनगर : मद्यनिर्मितीसाठी आवश्यक मका साठवून ठेवलेली भलीमोठी टाकी अचानक फुटल्याने मक्याच्या ढिगाऱ्याखाली दबून चार कामगार ठार झाले. शेंद्रा पंचतारांकित एमआयडीसीतील रॅडिको कंपनीत शुक्रवारी (दि. १५) दुपारी २ वाजेच्या सुमारास ही दूर्घटना घडली. घटनास्थळी मोठमोठ्या जेसीबी आणि पोकलेनद्वारे मक्याचा ढिगारा बाजुला करून मजुरांचे बचावकार्य रात्री उशिरापर्यंत सुरु होते. या ढिगाऱ्याखाली आणखी काही मजूर दबल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
किसन सर्जेराव हिरडे (४५, रा. गोपाळपूर, नारेगाव), दत्तात्रेय लक्ष्मण बोदरे (३५, रा. कुंभेफळ), विजय भीमराव गवळी (४५, रा. अशोकनगर) आणि संतोष भास्कर पोपळघट (३५, रा. भालगाव), अशी मृतांची नावे आहेत.
शेंद्रा एमआयडीसीत रॅडिको कंपनी आहे. तेथे मद्यनिर्मिती केली जाते. त्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणून मक्याची मोठ्याप्रमाणात साठवणूक केलेली आहे. ट्रकने आलेली मका एका शेडमध्ये साठविली जाते. तेथेच प्रत्येकी ३ हजार मे. टनाच्या दोन टाक्या (सायलो) बांधलेल्या आहेत. लोखंड आणि अॅल्यूमिनियमच्या या टाक्या असून एका टाकीला लिकेज होते. तेथे कपडा लावून ठेवलेला होता. त्याच टाकीच्या दूरूस्तीचे काम शुक्रवारी हाती घेतले होते. वेल्डिंग करून ते लिकेज बंद करण्यात येणार होते. तेथे चार मजूर प्रत्यक्ष काम करीत होते, तर १२ मजूर आजुबाजुला इतर कामात होते. दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास ज्या टाकीची दूरूस्ती सुरु होती तीच टाकी अचानक फुटली आणि ३ हजार मे. टन मका मजुरांच्या अंगावर कोसळली. या ढिगाऱ्यात तेथील मजूर दबले. त्यात चौघांचा मृत्यू झाला. मक्याच्या ओझ्याने तेथेच खाली असलेले शेडदेखील कोसळले.
ट्रकने मका कंपनीत आणल्यावर शेडमध्ये खाली केला जातो. आजही एक ट्रक तेथे खाली करण्यासाठी आला होता. तीन मजूर तो ट्रक खाली करीत होते. टाकी फुटल्यावर शेड कोसळले. त्यात ट्रकही दबला. तेथील मजुरही अडकले होते. मात्र, इतर मजुरांनी तत्काळ धावाधाव करून ट्रक चालक गणेश दाभाडे याच्यासह चौघांना सुखरुप बाहेर काढून त्यांचा जीव वाचविला.
ज्या टाकीची दुरूस्ती सुरु होती, ती फुटण्याची शक्यता वर्तविली जात होती. काम सुरु असताना १० मिनिटे आधीच काही मजुरांनी तशी शंकादेखील उपस्थित केली होती. त्यामुळे काम करणारे सोडून इतर मजूर तेथून बाजुला गेले होते. त्यामुळे तेथे फक्त प्रत्यक्ष काम करणारेच मजूर होते.
मक्याची साठवणूक करण्यासाठी लोखंड आणि अॅल्यूमिनियमपासून तयार केलेल्या ३ हजार मे. टनाच्या टाकीचे (सायलो) आयुष्य २५ वर्षे असते. मात्र, रॅडिको कंपनीतील ही टाकी अवघ्या १५ वर्षांतच फुटली आणि चार मजुरांचा जीव घेतला. याबाबत अधिकची माहिती देण्यास प्रकल्प प्रमुख (प्लांट हेड) आशिष कपूर यांनी टाळाटाळ केली. खा. कल्याण काळे यांनादेखील त्यांनी माहिती दिली नाही. ते लपवालपवी करीत असल्याचे स्पष्टपणे दिसले. किती मजूर काम करतात, हेदखील त्यांना सांगता आले नाही.
दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास कंपनीत ही दूर्घटना घडली. पहिल्या तासाभरात दोन जखमींना बाहेर काढत खासगी रुग्णालयात नेले. तेथे त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर सायंकाळी साडेचार ते पाच वाजता तिसरा आणि संध्याकाळी सव्वासात वाजता चौथा मृतदेह आढळला. मृत संतोष पोपळघट यांच्या नातेवाईकांनी कंपनीतच ढिय्या दिला. जोरदार घोषणाबाजी केल्याने तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, घटनास्थळी पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी पाहणी केली. तसेच, १० जेसीबी, ४ पोकलेन, ३ क्रेनद्वारे बचावकार्य सुरु होते. १२ रुग्णवाहिका आणि अग्निशामक दलाच बंबही तेथे दाखल करण्यात आला होता.