प्रातिनिधिक छायाचित्र  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Solapur Dhule highway accident : सोलापूर-धुळे महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन महिला ठार

एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद

पुढारी वृत्तसेवा

वाळूज महानगर : अज्ञात वाहनाने रस्ता : ओलांडणाऱ्या दोन महिलांना चिरडल्याची घटना बुधवारी (दि.२८) रात्री सोलापूर-धुळे महामार्गावरील तनवाणी शाळेसमोर घडली.

अनुसया लालसिंग चव्हाण (४२, रा. दराटी, ता.उमरखेड, जि. यवतमाळ) व वंदना नागोराव चव्हाण (३२, रा. बोधडी, ता. किनवट जि. नांदेड ह. मु. तनवाणी शाळा परिसर) असे अपघातात ठार झालेल्या महिलांची नावे आहेत.

या विषयी मिळालेल्या माहितीनुसार अनुसया चव्हाण व वंदना चव्हाण या वाळूज येथील एका कंपनीत काम करत असत. बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास कंपनीतून सुटी झाल्यानंतर दोघी घराकडे निघाल्या होत्या.

सोलापूर-धुळे रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास महामार्गावरील तनवाणी शाळेसमोर त्या रस्ता ओलांडत असताना साजापूर फाट्याकडून एएस क्लब चौकाकडे भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनाने दोघींना जोराची धडक दिली.

या अपघातात चाकाखाली सापडून त्या चिरडल्या गेल्या. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक राजेश यादव, पोलिस उपनिरीक्षक शंकर शिरसाट, एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विनोद आबूज, पोलिस अंमलदार प्रकाश वाघ, शिवाजी गायकवाड, बनसोडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघींना बेशुद्धावस्थेत उपचारासाठी घाटी दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून अनुसया चव्हाण व वंदना चव्हाण यांना मृत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद घेण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT