टीडब्ल्यूजे कंपनीने गुंतवणूकदारांना घातला तब्बल 4.33 कोटींचा गंडा pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

TWJ financial scam : टीडब्ल्यूजे कंपनीने गुंतवणूकदारांना घातला तब्बल 4.33 कोटींचा गंडा

24 आरोपींवर एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : जादा परताव्याचे आकर्षक आमिष दाखवून ट्रेड विथ जाझ ग््रुाप ऑफ कंपनीने (टीडब्ल्यूजे) शहरातील प्रतिष्ठित नागरिकांसह 40 हून अधिक गुंतवणूकदारांना सुमारे 4 कोटी 33 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात बुधवारी (दि.18) तब्बल 24 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

आरोपी समीर सुभाष नार्वेकर, नेहा समीर नार्वेकर, अमित बालम, किरण कुंडले, मुनाफ मुकादम, स्वप्निल पवार, सुकश धाग, सिध्देश पाटील, प्रसन्न करंदीकर, महान कोरगावरकर, सुरज सुकासने, प्रणव बोर्डे, स्वप्निल देवळे, सौरभ बोर्डे, माहेश्वरी पाटणे, रघुवीर महाडीक, देवा घाणेकर, अमित जाधव, श्रषचन पाटील, अविनाश कदम, प्रतिक जासुतकर, रोहित म्हस्के, योगेश सपकाळ, सागर मंचेलवार अशी आरोपींची नावे आहेत.

फिर्यादी संतोष दामोदर शेवाळे (रा.मिटमिटा) यांच्या तक्रारीनुसार, ते एका खासगी हॉस्पिटलमध्ये एक्सरे टेक्निशिअन म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा मित्र दयानंद कदम याच्या माध्यमातून त्यांची ओळख प्रोझोन मॉलसमोरील गोल्डन सिटी सेंटरमधील ट्रेड विथ जाझ कार्यालयाशी झाली.

कंपनीचे प्रमुख समीर नार्वेकर आणि नेहा नार्वेकर यांनी शेवाळे यांना त्यांच्या 10 सिस्टर कंपन्यांची माहिती देऊन विश्वासात घेतले. महाराष्ट्रात 1200 कोटींची गुंतवणूक असल्याचा दावा केला होता. सुरक्षेसाठी 500 रुपयांच्या बाँडवर करारनामा आणि पोस्ट डेटेड चेक देऊन विश्वास संपादन केला जात असे. शेवाळे यांनी स्वतः 29 लाख रुपये गुंतवले होते, ज्यावर सुरुवातीला परतावा मिळाला, मात्र फेबुवारी 2025 पासून परतावा देणे बंद करण्यात आले.

शेवाळे यांच्यासह 38 लोकांच्या फसवणुकीचा आकडा 4 कोटी 33 लाखांच्या घरात गेला आहे. तक्रार करण्यासाठी गेलेल्या गुंतवणूकदारांना मॅनेजर सागर मंचेलवार आणि योगेश सपकाळ यांनी पोलिसांकडे तक्रार केली तर पैसे मिळणार नाहीत, अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार करत आहेत.

बड्या हॉटेलमध्ये सेमिनार आणि फसवणूक

ऑक्टोबर 2024 मध्ये हॉटेल ग््राीन लीफ येथे कंपनीने मोठा सेमिनार आयोजित करून अनेक नवीन गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढले होते. गुंतवणूकदारांनी पैशांसाठी तगादा लावला असता, सिंगापूरवरून 1000 कोटी येणार आहेत, अशी थाप मारून वेळकाढूपणा करण्यात आला. अखेर कार्यालय बंद करून आणि फोन उचलणे बंद केल्यावर आपली फसवणूक झाल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आले.

राज्यभरात गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा

संभाजीनगरच नव्हे, तर पुणे, मुंबई आणि कोकण पट्‌‍ट्यातही या कंपनीने हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. नार्वेकर दाम्पत्यावर राज्यात इतरत्रही गुन्हे दाखल असल्याने आता त्यांच्या बँक खात्यांची आणि मालमत्तेची माहिती पोलिस गोळा करत आहेत. नार्वेकरसह तीन आरोपींना ठाणे पोलिसांनी गेल्या महिन्यातच अटक केल्याचे सूत्रांनी सांगितले.

भरमसाट परताव्याचे आमिष

  • 10 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक : दरमहा 3 % परतावा.

  • 10 ते 25 लाखांपर्यंत गुंतवणूक : दरमहा 4 % परतावा.

  • 25 लाखांवर गुंतवणूक : दरमहा 5 % परतावा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT