वाळूज : उन्हाळ्याच्या सुट्टीत टेंभापुरी धरणात पोहण्याचा मोह एका तरुणाच्या जीवावर बेतला आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि. २६) दुपारी घडली. प्रिन्स आशेर श्रीसुंदर (वय १९, रा. ख्रिस्तीनगर- शांतीनगर, छावणी, छत्रपती संभाजीनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. कुटुंबातील तरुण मुलगा अचानक गेल्याने कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला असून, छावणी परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिन्स हा त्याचे मित्र अमित काकडे आणि आशिष डाके यांच्यासोबत रविवारी भरदुपारी टेंभापुरी धरणावर पोहण्यासाठी गेला होता. धरणात सध्या पाण्याची पातळी जास्त आहे. पाण्यात उतरल्यानंतर पोहताना प्रिन्सला पाण्याचा अंदाज न आल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. मित्रांनी आरडाओरड केली, मात्र त्याला वाचवता आले नाही.
घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिक व मित्रांच्या मदतीने पोलिसांनी प्रिन्सला बेशुद्धावस्थेत पाण्याबाहेर काढले. त्याला उपचारासाठी तात्काळ लिंबेजळगाळजवळील रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून, वाळूज पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
लोखंडी गेट बसवण्याची मागणी
शहर व परिसरातील तरुण नेहमी टेंभापुरी धरणात पोहण्यासाठी येतात. अशा दुर्घटना टाळण्यासाठी या रस्त्यावर लोखंडी गेट बसवण्याची मागणी राहुल ढोले यांनी केली आहे. विशेष म्हणजे, आ. प्रशांत बंब यांनी १४ फेब्रुवारी २०२५ रोजी संबंधित ग्रामपंचायत आणि पाटबंधारे विभागाला पत्र देऊनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.