Tractor rolled on papaya orchard, farmers are fed up with falling prices
कडेठाण, पुढारी वृत्तसेवा : घाम गाळून उभं केलेलं पीक जेव्हा योग्य भावाअभावी नष्ट करावं लागतं, तेव्हा मन हेलावून जातं. अशीच हृदयद्रावक घटना कडेठाण येथे घडली आहे. येथील परिश्रमी शेतकरी गणू भगवानराव वरकड यांनी एक एकर क्षेत्रात पपईची लागवड केली होती. सुरुवातीला बाग सुंदर वाढली, पपई भरपूर लागली; परंतु बाजारभावाच्या घसरणीने आणि निसर्गाच्या उलटलेल्या वाट्याने हे परिश्रम व्यर्थ ठरले.
वरकड यांनी ही पपईची रोपे सोलापूरहून आणली होती. सुरुवातीला शेतीसाठी त्यांनी सुमारे सत्तर हजार रुपये खर्च केला. त्यात गावरान शेणखत, रासायनिक खतांचे डोस, वेळोवेळी फवारण्या, मजुरीचा खर्च यांचा समावेश होता. सर्व काही नियोजनबद्ध पद्धतीने केले, मात्र अतिवृष्टीमुळे बागेवर व्हायरसचा प्रादुर्भाव झाला, त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला.
त्यातच व्यापाऱ्यांनी पपईसाठी फक्त दोन रुपये किलो असा अतिशय तुटपुंजा दर सांगितला. दोन रुपयांचा भाव ऐकून शेतकऱ्याचे मन खचले. त्या दरात वाहतूक, मजुरी, पॅकिंग यांचा खर्चही निघत नव्हता. त्यामुळे निराश झालेल्या वरकड यांनी अखेर एक एकर पपई बागेवर रोटावेटर फिरवण्याचा निर्णय घेतला.