वाळूज महानगर (छत्रपती संभाजीनगर) : तीसगाव येथे मंगळवारी (दि.१५) पहाटे दोन वाजेच्या सुमारास ९ दरोडेखोरांनी हातात लाकडी दंडुके व शस्त्र घेऊन दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी घरातील एका सदस्याला जाग आल्याने त्याने तात्काळ मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. शेजारी जागे झाल्याचे पाहून दरोडेखोर पसार होत असताना गावकऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला, मात्र दरोडेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. ही सर्व घटना गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार तीसगाव येथे मंगळवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास ९ दरोडेखोरांनी हातात लाकडी दंडुके व शस्त्र तसेच रुमालाने तोंडावात शिरले. सुरुवातीला दरोडेखोरांनी संदिप चाबुकस्वार (रा. तिसगाव) यांच्या घराच्या खोलीला बाहेरून कडी लावून ते दुसऱ्या खोलीच्या दरवाज्याचा कडी-कोयंडा तोडण्याचा प्रयत्न करू लागले. यावेळी बाहेरून कसला तरी आवाज आल्याने चाबुकस्वार यांच्या घरातील एका सदस्याला जाग आली. त्यांना घराबाहेर चोर उभे असल्याचा संशय आल्याने त्यांनी आरडाओरड सुरु केली. त्यांचा आवाज ऐकून शेजारी जागे झाल्याचे पाहून दरोडेखोर तेथून पसार होत असतांना गावकऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला. मात्र अंधाराचा फायदा घेऊन दरोडेखोर पसार झाले. हा सर्व घटनाक्रम गावात ठिकठिकाणी बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अशा घटनांमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
तीसगाव परिसरात दिवसेंदिवस चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी चोरट्यांनी सिडको वाळूज महानगर परिसरात एका शिक्षकाचे बंद घर फोडून साडेतीन तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. तीसगाव ग्रामपंचायत हद्दीत जवळपास ५० हजारांपेक्षा जास्त लोक वास्तव्यास आहेत. यातील बहुतांश जण कामगार असून, ते कंपन्यांमध्ये तिन्ही पाळीमध्ये काम करतात. बंद घर हेरून चोरटे घरफोडी करत असून, सिडको वाळूज महानगर परिसरात घरफोडीच्या घटना नेहमी घडत असतात.
तीसगाव ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या मासिक बैठकीत तीसगाव परिसरात वाढत असलेल्या चोरीच्या घटनांविपयी चर्चा करून परिसरात पोलिस गस्त वाढविणे, अनोळखी व्यक्ती तसेच विनाक्रमांकाच्या वाहनधारकांची चौकशी करण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे यांना देण्यात आले. बैठकीला सरपंच शकुंतला कसुरे, उपसरपंच गणेश बिरंगळ, ग्रामपंचायत अधिकारी शितल उमाप, ग्रा.पं. नागेश कुठारे, संजय जाधव, विष्णू जाधव, राजेश कसुरे, नितीन जाधव, अरुणा जाधव, प्रविण हांडे, संगीता अंभोरे, गोदावरी कोल्हे, रेणुका सलामपुरे, पूजा तरैय्यावाले आदींची उपस्थिती होती.