गणेश कोलते
पिंपळदरी: सिल्लोड तालुक्यातील सावरखेडा–हळदा रस्त्यावर बुधवारी (दि.३०) रात्री सुमारे अकरा वाजता वाघीण आणि तिच्या तीन पिल्लांचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या काही स्थानिक नागरिकांनी वाघीण व पिल्लांना रस्त्यावरून जाताना पाहिले आणि हा थरारक क्षण मोबाईलमध्ये कैद केला. संबंधित व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वाघीण रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडीतून थेट रस्त्यावर आली आणि तिच्या मागोमाग तीन पिल्लेही रस्त्यावर उतरली. काही वेळ रस्त्यावर थांबून नंतर सर्वजण जंगलाच्या दिशेने निघून गेले.
या मार्गावरून दररोज अनेक ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी आणि दुचाकीस्वार ये-जा करतात. त्यामुळे या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. "रात्रीच्या वेळी अनावश्यक फिरणे टाळावे आणि वनविभागाने तातडीने तपासणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात," अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
यापूर्वीही या परिसरात वन्यप्राणी दिसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या, मात्र वाघीण व पिल्ले प्रत्यक्ष रस्त्यावर दिसल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. वनविभागाने रात्रपाळी सुरू करावी आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरू लागली आहे. सध्या संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण असून, वनविभागाकडून तातडीने कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.