Three sentenced to life imprisonment for fatal attack on youth
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जुना वाद मिटवायचा असल्याचे सांगत एका तरुणाला बोलावून त्याला क्रिकेट बॅट, लोखंडी रॉड व काठ्यांनी जीवघेणा हल्ला करुन गंभीर जखमी केल्याप्रकरणी तिघा आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी २० हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.एम. जमादार यांनी ठोठावली.
शेख अझहर शेख कादर (१८, रा. गणेशनगर, पडेगाव), अजय नानासाहेब मस्के (१८) आणि आकाश सखाराम मस्के (२३, दोघे रा. सैलानीनगर, पडेगाव) अशी आरोपींची नावे आहेत. ही घटना १० जुलै २०१८ रोजी सायंकाळी पडेगाव येथील नवकार यश हौसिंग सोसायटीसमोरील शॉपिंग कॉम्प्लेक्स परिसरात घडली होती.
प्रकरणात प्रमोद रामकृष्ण हिरवडे (४४, रा. मिटमिटा) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, फिर्यादीचा मुलगा सागर हिरवडे याला जुना वाद मिटवायचा असल्याचा फोन करून आरोपींनी बोलावून घेतले. त्यानुसार सागर गेला असता तेथे आधीच दबा धरून बसलेल्या आरोपी व त्यांच्या साथीदारांननी सागरला मारहाण केली. एका विधिसंघर्षग्रस्त बालकाने क्रिकेट बॅटने सागरच्या डोक्यावर जोरदार वार केला. सागर खाली कोसळताच, आज सागरला जिवंत ठेवू नका, असे म्हणत अझहर शेख याने लोखंडी रॉडने त्याच्या हातावर वार केला. उर्वरित आरोपींनी काठ्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात सागर गंभीर जखमी झाला. प्रकरणात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक सरकारी लोकाभियोक्ता एन.बी. धोंगडे व एन.आर. कहाणे यांनी जखमीची थेट साक्ष, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब नोंदवले. वैद्यकीय पुरावे, जप्त केलेला लोखंडी रॉड तसेच फॉरेन्सिक अहवाल सादर करण्यात आले. डॉक्टरांच्या साक्षीत सागरच्या शरीरावर एकूण बारा जखमा असून त्यातील डोक्यावरील जखमा प्राणघातक असल्याचे स्पष्ट झाले.
न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट केले की, या प्रकरणात पाचपेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश होता. सागरला बोलावण्यापूर्वीच हल्ल्याचे नियोजन करण्यात आले होते. क्रिकेट बॅट, लोखंडी रॉड आणि काठ्या ही प्राणघातक शस्त्रे असून त्यांचा वापर करून डोक्यावर व हातावर वार करण्यात आले, त्यामुळे खुनाचा प्रयत्न झाल्याचे सिद्ध होते. न्यायालयाने असेही नमूद केले की, प्रत्यक्ष वार कुणी केला यापेक्षा आर- ोपींनी सामूहिक हेतूने गुन्हा केला. त्यामुळे भारतीय दंड विधानाच्या कलम १४९ नुसार सर्व आरोपी समानरीत्या दोषी ठरतात. गुन्ह्यानंतर वापरलेली शस्त्रे लपवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचेही पुराव्यांतून स्पष्ट झाले.
जखमी मुलाला नुकसानभरपाई
खुनाच्या प्रयत्नासाठी तिघा आरोपींना जन्मठेप व विविध कलमांखाली प्रत्येकी २० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली असून सर्व शिक्षा एकत्रितपणे भोगायच्या आहेत. विशेष म्हणजे, आरोपींना ठोठावण्यात आलेल्या दंडाची रक्कम जखमी मुलाला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.