Three-day district-level science exhibition in Ganori
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित ५३ वे तीन दिवसीय जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन पीएमश्री जि.प. प्रशाला, गणोरी येथे होत असून, याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी दिली.
राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर यांच्या निर्देशानुसार आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवारी, २९ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष अनिल साबळे असतील.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कांबळे, तसेच शिक्षणाधिकारी (योजना) अरुण शिंदे उपस्थित राहणार आहेत. प्रदर्शनाचा समारोप जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते होणार असून, विभागीय शिक्षण उपसंचालक कैलास दातखिळ आणि प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या संचालक शैलजा दराडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या प्रदर्शनात बक्षीसपात्र ठरलेल्या प्राथमिक विभागातील ३, माध्यमिक विभागातील ३, तसेच दिव्यांग विद्यार्थी गट, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक आणि प्रयोगशाळा परिचर यांच्या प्रत्येकी एक अशा प्रतिकृती बालवैज्ञानिक व मार्गदर्शक शिक्षकांच्या माध्यमातून सादर करण्यात येणार आहेत. गणोरी, फुलंब्री परिसरातील शाळा, विद्यार्थी व नागरिकांनी या तीन दिवसीय विज्ञान प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
विकसित व आत्मनिर्भर भारतासाठी स्टेम : मुख्य विषय
विकसित व आत्मनिर्भर भारतासाठी स्टेम (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणित) हा या प्रदर्शनाचा मुख्य विषय आहे. त्याअंतर्गत शाश्वत शेती, कचरा व्यवस्थापन, प्लास्टिकला पर्याय, हरित ऊर्जा, उदयोन्मुख तंत्रज्ञान, मनोरंजक गणितीय मॉडेलिंग, आरोग्य व स्वच्छता, जलसंवर्धन व व्यवस्थापन आदी उपविषयांवरील नावीन्यपूर्ण व सृजनशील संकल्पना उपकरणांच्या माध्यमातून मांडल्या जाणार आहेत.
मिळणार विज्ञानाची नवी दृष्टी
याशिवाय, प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांसाठी रात्रीचे आकाशदर्शन, तारांगण, सायन्स ऑन व्हील यांसारख्या उपक्रमांचीही व्यवस्था करण्यात आली असून, विज्ञानाची नवी दृष्टी मिळणार आहे.