Thousands of years old Nageshwar Mahadev Temple
भाग्यश्री जगताप
छत्रपती संभाजीनगर : शहरामध्ये अनेक मंदिरे ही प्राचीन काळापासून आहेत. त्याला नागेश्वरवाडी येथील नागेश्वर महादेव मंदिरही अपवाद नाही. हे मंदिर फार प्राचीन असून, मंदिरातील शिवपिंड ही हजारो वर्षे जुनी आहे, अशी माहिती मंदिराचे पुजारी योगेश मुंगीकर यांनी दिली.
सध्या पवित्र समजला जाणारा श्रावण महिना सुरू आहे. हा महिना शंकराला समर्पित असतो. त्यामुळे श्रावणात शंकराची आराधना करण्याला फार महत्त्व आहे. त्यामुळे विविध शंकर मंदिरांमध्ये श्रावणात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. छत्रपती संभाजीनगर शहरातील नागेश्वरवाडी या ठिकाणी हे महादेवाचे मंदिर आहे. शहरातील अतिशय प्राचीन मंदिरामध्ये ारो या मंदिराचा समावेश होतो. या मंदिरामध्ये असलेली महादेवाची पिंड हजार वर्षे जुनी आहे. या महादेवाच्या पिंडीवरती एक तांब्याचा पत्रा बसवलेला आहे. या मंदिराचे बांधकाम हे सागवानी वाड्यामध्ये केले आहे.
इतिहास अभ्यासकांच्या मते, मोहेंजोद काळात जशी महादेवाची पिंड होती अगदी त्या पद्धतीची ही पिंड आहे. निजामापासून बचाव करण्यासाठी बडोदे (वडोदरा) सरकारचे सैन्य या मंदिरामध्ये लपले होते. बडोदे सरकारने महादेवाला साकडे घातले होते की, आम्ही जर इथून सुखरूप निघालो तर आम्ही मंदिर बांधू, जेव्हा बडोद्याचे सैन्य सुखरूप बचावले तेव्हा बडोद्याच्या सरकारने नागेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला.
सुमारे सतराशे ते अठराशे या शतकात हे मंदिर बांधलेले आहे. मंदिराची रचना वाड्याप्रमाणे असून त्यात सागाच्या लाकडांचा वापर करण्यात आलेला आहे. या मंदिरातील नंदी एकदम महादेवाच्या पिंडीच्या शेजारीच आहे. याबाबत देखील एक आख्यायिका सांगितली जाते. निजामाने मंदिराबाहेरचे नंदी मंदिरातच ठेवण्याचे फर्मान काढले होते. जर नंदी मंदिराबाहेर असेल तर मंदिर उद्धवस्त करण्याची धमकी देखील दिली होती. त्यामुळे या महादेवाच्या मंदिरामधील नंदी अगदी महादेवाच्या पिंडी शेजारी आहे. नवसाला पावणारा महादेव म्हणून नागेश्वर मंदिराची ख्याती आहे. मंदिरात महाशिवरात्री व दर श्रावण सोमवारी शृंगार, अभिषेक व महापुजा केली जाते.