Thousands of Warkaris had darshan of Nath
पैठण पुढारी वृत्तसेवाः
भागवत एकादशी अक्षता वारीनिमित्त पैठण येथे ङ्गभानुदास एकनाथ जयघोष करून हजारो वारकरी भाविक भक्तांनी श्रीसंत एकनाथ महाराज यांचे दर्शन घेऊन पंढरपूर येथील आषाढी वारी सोहळ्याचे अक्षता निमंत्रण पत्रिका श्रीसंत एकनाथ महाराज यांना देण्याचा सोहळा पारंपरिक प्रथेप्रमाणे पालखी सोहळाप्रमुख नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
सायंकाळी श्रीसंत एकनाथ महाराज यांच्या समाधी मंदिरात पालखी सोहळा प्रमुख नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले यांच्या प्रमुख उपस्थितीत ह.भ.प योगेश महाराज गोसावी पालखीवाले, हभप रावसाहेब महाराज गोसावी, रवींद्र पांडव, श्रीकृष्ण कुलकर्णी, अथर्व पांडव, रेखा कुलकर्णी यांनी नाथचरणी पत्रिका अक्षता देऊन पायी दिंडी सोहळ्यातील महाराज मंडळी व मानकरी सेवा करी यांना अक्षता वाटप केले.
महिन्याची भागवत एकादशी निमित्त पायी वारी करणाऱ्या वारकरी भाविक भक्ताने नाथांचे मंदिर फुलून गेले होते. दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना मोफत फराळ वाटप व्यवस्था विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आमदार विलास बापू भुमरे, कार्यकारी विश्वस्त दादा पाटील बारे व विश्वस्त मंडळ यांच्या वतीने करण्यात आली होती.
दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी व वारकऱ्यांनी हरीनाम गजर करून भानुदास एकनाथ जयघोष करून नाथांच्या समाधी व गावातील नाथ मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. याप्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी मंदिर परिसरासह बस स्थानकावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.
भागवत एकादशीला वारकरी संप्रदायात मोठे स्थान असून या एकादशीला पंढरपूर येथील आषाढी वारी सोहळ्यात सहभाग होणारे वारकरी महाराज मंडळी सेवेकरी यांना वारीचे अक्षता देऊन पायी दिंडी चालकाकडून निमंत्रण देण्यात येते.