छत्रपती संभाजीनगर

त्या २०० शिक्षकांची आचारसंहितेनंतरच होणार नियुक्ती!

Shambhuraj Pachindre

छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृतसेवा : राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे पवित्र पोर्टलच्या मार्फत राबविण्यात येत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत राज्यात आतापर्यंत ४ हजार ४७४ उमेदवारांना नियुक्ती मिळाली असली तरी छत्रपती संभाजीनगरमध्ये १५२ शिक्षकांची नियुक्ती बाकी आहे. तसेच निवडणूकीच्या आचार संहितेपूर्वी जिल्हात बदलून आलेले २५० शिक्षकांपैकी केवळ ५० जणच रुजू झाले असून, उर्वरित २०० जण संहिता शिथिल झाल्यानंतर नियुक्त होणार आहेत. यामुळे उर्वरित शिक्षक भरती आणि रिक्त पदानुसार आंतर जिल्हा बदली व विनंती बदल्या देखील आचारसंहिते नंतरच होण्याची शक्यता आहे.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुलाखतीशिवाय शिफारशीचा पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये ११ हजार उमेदवारांची शिफारस फेब्रुवारीमध्ये करण्यात आली. त्यानंतर उमेदवारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया सुरु झाली. मात्र, लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे निवड झालेल्या शिक्षकांना नियुक्ती देण्याची प्रकिया थांबली होती. मात्र, शिक्षण विभागाने भरतीबाबत निवडणूक आयोगाला प्रस्ताव दिला होता.

त्यानुसार आयोगाने मतदान झालेल्या जिल्हयांत शिक्षकांची नियुक्ती करण्यास परवानगी दिली. आता विधान परिषदेतील पदवीधर शिक्षक, मतदारसंघाची निवडणूक जाहिर झाल्याने पुन्हा नियुक्ती प्रक्रिया आणखी पुढे ढकलली जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र आता निवडणूक आयोगाने शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जिल्हयांनी निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत.

आधी विनंती बदल्या नंतर पदस्थापना!

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जिल्हातील १२९ नव्या शिक्षकांची पदस्थापना थांबलेली आहे. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने या शिक्षकांना रुजू करून घेण्यासाठी तयारी सुरू केली. असे असले तरी त्याआधी शिक्षकांच्या विनंती बदल्या करायच्या, त्यानंतरच नवीन शिक्षकांना पदस्थापना द्यायच्या, असे नुकतेच जिल्हा परिषदेच्या विश्वसनीय सूत्रांनी सांगितले होते. त्यामुळे आधी विनंती बदल्या, नंतर नव्या शिक्षकांना पदस्थापना मिळणार अशी जोरदार चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात रंगली आहे.

SCROLL FOR NEXT