वाळूज महानगर : घरातील व्यक्ती देवदर्शनाला गेल्याची संधी साधत बंद घर फोडून चोरट्यांनी लाखो रुपये किंमतीचे संग्रहित जुनी चांदीची नाणी, जुन्या नोटांवर डल्ला मारला. ही घटना सिडको वाळूज महानगर-१ माऊली नगरात सोमवारी (दि.१७) रात्री उघडकीस आली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तारादेवी इंदरचंद मुथा (वय ७५) या त्यांची मुलगी डॉ. मोनिका मुथा व नातीसह सिडको वाळूज महानगर-१ मधील माऊली नगरात राहतात. १५ मार्च रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास घराला कुलूप लावून तारादेवी या मुलगी मोनिका व नातीसोबत राजस्थानमधील जोधपूर येथे देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी गेल्या होत्या. देवदर्शन घेऊन ते सोमवारी रात्री परतले असता त्यांना घराचे कुलूप तोडण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता घरातील सर्व समान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले.
घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कपाटाची पाहणी केली असता तारादेवी यांच्या पतीने संग्रहित केलेले आरबीआय गव्हर्नर अय्यंगर बॉम्बे मिंटचे ५ रु, १० रु, १०० रु. व १००० रु. च्या नोटांचा सेट, आरबीआय गव्हर्नर एस जगन्नाथन् बॉम्बे मिटच्या १०० च्या १० नोटा, आरबीआय गव्हर्नर नरसिंह राय बॉम्बे मिटच्या १०० रुपयांच्या १० नोटा, आरबीआय गव्हर्नर बी. रामाराव बॉम्बे मिटच्या १०० रुपयांच्या १० नोटा, १, २ व ५ रुपयांच्या नोटांचा सेट, १ ते १००० रुपये पर्यंतच्या जुन्या भारतीय चलनी ५०० ते ६०० नोटा, १९७० मधील १ रुपयांचे ५ क्वाईन, १९५४ चे १ रुपयांचे ५ क्वाईन, १९३९ मधील १ रुपयांचे १० क्वाईन, अकबरचे १० क्वाईन, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ताजवाली राणी सेट, चोटीवाली राणी सेट, अडवर्ड सेट, पंचम् जॉर्ज सेंट, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जॉर्ज सेंट तसेच मिक्स सिल्व्हरचे २५० क्वाईन, कानातील सोन्याचे रिंग, रोख ६ हजार रुपये असा जवळपास लाखो रुपये किंमतीची संग्रहित जुनी नाणी व नोटा चोरीला गेल्याचे त्यांना समजले. दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गीते तसेच ठसे तज्ञांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी तारादेवी मुथा यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तारादेवी यांचे पती इंदरचंद यांचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. जुनी नाणी व नोटा संग्रहित करण्याचा छंद पाळून ते जुनी नाणी व नोटा खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत असत. त्यांनी संग्रहित केलेल्या लाखो रुपये किंमतीची जुनी चांदीची नाणी, जुन्या नोटा त्यांच्या पत्नीने बेडरूममधील लाकडी कपाटामध्ये ठेवल्या होत्या. चोरट्यांनी त्या चोरून नेल्या.