पैठण : तालुक्यातील हिरडपुरी येथे महावितरणच्या थकीत वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या आपेगाव महावितरण विभागाच्या विद्युत सहाय्यकला मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि.१९) घडली आहे. दरम्यान या संदर्भात हिरडपुरी येथील एकाविरुद्ध पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, तालुक्यातील हिरडपुरी येथे शनिवारी (दि.१९) आपेगाव महावितरण उपविभागाचे विद्युत सहाय्यक माधव सुदाम तांगडे हे वीज बिल थकबाकी वसुली करण्यासाठी हिरडपुरी येथे गेले होते.या गावातील गणेशनगर परिसरातील वीज ग्राहक भाऊसाहेब रावसाहेब शेळके यांच्या बिलाची वसुली करत असताना गावातील बबन रामचंद्र कचरे याने विद्युत सहाय्यक सुदाम तांगडे यांना कसली थकबाकी वीज बिल मागत आहे, असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच गळ्यात रुमाल टाकून बुक्क्याने व दगडाने मारहाण केली.यापुढे वीज बिल वसुलीसाठी आल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली.
यावेळी गावातील देविदास गांधले, शिवाजी नरवडे, सोमनाथ झांबरे यांनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. विद्युत सहाय्यक तांगडे यांनी या घटनेची पाचोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.पैठण तालुका महावितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता अशोक घुले यांनी पाचोड सहाय्यक पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांची भेट घेवून महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणी प्रकरणात योग्य दखल घेण्याची मागणी केली. यानुसार पाचोड पोलीस ठाण्यात बबन कचरे (रा. हिरडपुरी ता.पैठण) विरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास विहामांडवा पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक राम बाराहाते हे करीत आहेत.