पैठण : पैठण शहरातील सुरज मोबाईल शॉपीची भिंत फोडून महागड्या लाखो रुपयांचे मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या चोरट्यांकडून ५ लाख १० हजार रुपयाचे ५१ नग मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, पैठण शहरातील सुरज मोबाईल शॉपी या दुकानाची दि.५ मे २०२४ रोजी भिंत फोडून अज्ञात चोरट्यांनी मोठ्या प्रमाणावर किमती मोबाईल चोरून नेल्याची तक्रार मोबाईल शॉपी चे मालक जगदीश नागोरी रा.पैठण यांनी पैठण पोलीस ठाण्यात दाखल केली होती. यासंदर्भात पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस उपनिरीक्षक दीपक पारधे,पोह सुनील खरात, विठ्ठल डोके, गोपाल पाटील, राहुल गायकवाड, डमाळे यांनी गोपनीय माहिती आधारे मोबाईल चोरी करणाऱ्या मोतीबाग चौक मालेगाव येथे आर्यन पप्पू शेख वय १८ वर्ष रा. कापूरवाडी जिल्हा अहिल्यानगर (अहमदनगर) याला ताब्यात घेऊन या गुन्ह्याबाबत चौकशी केली. यानंतर चौकशी केली असता या आरोपीने गुन्हा केल्याची कबुली देऊन ही चोरी त्यांचा साथीदार फिरोज महमूद सय्यद रा. कापूरवाडी या दोघांनी मिळून केल्याचे सांगितले. यावेळी आरोपीच्या ताब्यातून ५ लाख १० हजार रुपयाचे ५१ नग मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत केला.
फिरोज महमूद सय्यद हा आरोपी मात्र फरार झालेला आहे. या आरोपीने आत्तापर्यंत छत्रपती संभाजीनगरसह इतर जिल्ह्यात काही चोरीचे गुन्हे केलेले आहेत का ? याबाबत गुन्हे शाखा पोलीस पथक अधिक तपास करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांनी दिली आहे.