छत्रपती संभाजीनगर :
जालना येथून संभाजीनगरच्या पिशोर गावात नातलगाला भेटण्यासाठी आलेल्या तीस वर्षीय तरुणावर चांगलाच प्रसंग ओढावला. गावात येताच त्या तरुणाच्या पाठीमागे मोकाट कुत्रे लागले, दरम्यान त्यांच्यापासून बचाव करत पळत असताना तरुण खोल भूमिगत विहिरीत जाऊन पडला.
या विहिरीत एक दोरी सोडण्यात आली होती. त्या दोरीला धरून त्याने जीव वाचवला व तसंच लटकत चक्क दोन दिवस आणि दोन रात्र उपाशी राहून काढल्या. दरम्यान तो मदतीसाठी आरडा ओरड करत मदत मागत राहिला. पण विहीर निर्मनुष्य ठिकाणी असल्याने कुणीही त्याच्या मदतीला आले नाही.
मात्र तिसऱ्या दिवशी मोहोळ शोधण्यासाठी काही जण त्या निर्मनुष्य ठिकाणी आले आणि गावकरी पोलिसांच्या मदतीने त्या तरुणाला सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. संदीप घटकवडे असे विहिरीत पडलेल्या तरुणाचे नाव आहे.