वर्षाची सुरुवात तस्करांच्या हल्ल्याने, शेवट तोडफोडीने File Photo
छत्रपती संभाजीनगर

वर्षाची सुरुवात तस्करांच्या हल्ल्याने, शेवट तोडफोडीने

संतप्त नागरिकांनी अनेकदा पेटवल्या हायवा, अनेकांचा बळी. वीरगाव ठाणे हद्दीत वाळू तस्करांची दहशत कायम

पुढारी वृत्तसेवा

वैजापूर: वर्षाची सुरुवात वाळू तस्करांच्या हल्ल्याने तर शेवट वाहनांच्या तोडफोडीने झाल्याने, वर्षभर नागरिकांना वाळूमाफियांच्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. जेव्हा पोलिस आणि तस्करांची भागिदारी होते, तेव्हा कायद्याचा नव्हे तर थेट गुंडाराजचा उदय होतो. या काळ्या भागिदारीतून गैंगवॉर पेटतात.

परिसरात दहशत पसरते आणि वाळू वाहतूक करणाऱ्या हायवाखाली माणसांचे प्राण निर्दयपणे चिरडले जातात, असा आरोप नागरिकांतून होत आहे. एकीकडे निष्पाप नागरिकांचे बळी जात असताना, दुसरीकडे तालुक्यातील अव्वलगावात मध्यरात्री बाळू तस्करांच्या दोन गटांमध्ये उघड संघर्ष उफाळून आला. या वादातून वाहनांची तोडफोड करत खुलेआम दहशत माजवण्यात आली. परिणामी, वैजापूर तालुका पुन्हा एकदा बेकायदेशीर वाळू तस्करीच्या दहशतीखाली सापडला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तालुक्यातील वीरगाव पोलिस ठाणे हद्दीतील अव्वलगाव-नागमठाण परिसरात गोदावरी नदीपात्रातून दिवसा व रात्री खुलेआम अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरू आहे. पोकलेन आणि मोठमोठ्या हायवा वाहनांच्या माध्यमातून ही वाहतूक केली जात असून, या तस्करीवरून तस्करांमध्ये वारंवार वाद होत आहेत.

अशाच वादातून शनिवारी (दि.२७) किरकोळ कारणावरून सुरू झालेला संघर्ष काही क्षणातच हाणामारीत बदलला. दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला करत वाहनांची थेट तोडफोड केली. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहे.?

घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, अव्वलगाव, डाकपिंपळगाव, बाबुळगावगंगा, भालगाव, पुरणगाव या भागांत सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीमुळे यापूर्वीही एका नागरिकाचा हायवा वाहनाखाली चिरडून मृत्यू झाला होता.

तसेच हायवांच्या त्रासाला कंटाळून संतप्त नागरिकांनी काही वेळा हायवा पेटवून दिल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. इतकेच नव्हे तर, वाळू तस्करांकडून हत्यारांचा वापर करून गावांमध्ये दहशत निर्माण केल्याचे प्रकार यापूर्वीही उघडकीस आले आहेत. तसे गुन्हेही वीरगाव पोलिस ठाण्यात दाखल आहेत.

मात्र, या गंभीर प्रकरणांबाबत पोलिसांची भूमिका महातावर घडी, तोंडावर बोटफ अशीच राहिल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे आता नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, तस्करांवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT