The woman and the girl were blown away by the car, the vehicles also hit
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सुसाट कारचालक प्राध्यापक पुत्राने पदमपुरा भागात पायी जाणाऱ्या एका महिलेसह लहान मुलीला उडवून धूम ठोकली. त्याचा काही तरुणांनी पाठलाग सुरू केला. तेव्हा त्याने पंचवटी, मध्यवर्ती बसस्थानक, मिलकॉर्नर, नागेश्वरवाडी, समर्थनगर भागात सुसाट जाताना आणखी तीन वाहनांना उडविले.
हा प्रकार रविवारी (दि.१७) रात्री नऊ ते दहाच्या सुमारास घडला. संकेत शंकर अंभोरे (२८, रा. भीमनगर, भावसिंगपुरा) असे कारचालकाचे नाव असून, समर्थनगर भागात संतप्त नागरिकांनी अखेर अंभोरेला पकडून बेदम चोप दिला. कारची तोडफोड करून त्याला क्रांती चौक पोलिसांच्या स्वाधीन केले. कारमध्ये बिअरचा कॅन गिअर-जवळच ठेवलेला होता.
फिर्यादी प्रकाश राजू कटारे (३३, रा. पदमपुरा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गोकुळाष्टमी उत्सवाचा गल्लीत भंडारा कार्यक्रम संपवून ते तीन मित्रांसोबत गप्पा मारत उभे होते. त्याचवेळी संत तुकाराम हॉस्टेलसमोर त्यांच्या गल्लीतील अनासाबाई भगीरथ बरंडवाल आणि एक लहान मुलगी पंचवटी चौकाच्या दिशेने पायी जात असताना त्यांना अहिल्याबाई होळकर चौकाकडून सुसाट आलेल्या स्विफ्ट कारचालकाने (एमएच २०- एफ पी-९०६६) गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडल्या. कारचालक अंभोरे तेथून पसार झाला. तेव्हा कटारे आणि त्यांच्या मित्राने दुचाकीने कारचा पाठलाग सुरू केला.
कार पंचवटी चौकातून मध्यवर्ती बसस्थानकाकडे सुसाट जात होती. कार्तिकी सिग्नलजवळ कारचालकाने इनोव्हा (एमएच- २०-एचबी-५०१६) धडक दिली. तेथून अंभोरे कार घेऊन सावरकर चौकाच्या दिशेने वेगात निघाला. बंडू वैद्य चौकात त्याने दुचाकीला (एमएच-२०-एफए-७०५६) धडक देऊन तेथून पुन्हा परत समर्थनगरकडे वळला. गणेश मंदिर रोडवर एका स्कार्पिओला (एमएच-२०-डीजे-७२४३) धडक देऊन तो थांबला. तेथे जमलेल्या नागरिकांनी अंभोरेला कारच्या बाहेर ओढले. तेव्हा तो दारूच्या नशेत धुंद असल्याचे समजले. त्यामुळे संतप्त जमावाने त्याला बेदम चोप दिला. कारची तोडफोड केली. क्रांती चौक पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात रात्री उशिरा बीएनएस कलम २८१, १२५ (बी), ३२४ (४), मोटार वाहन कायदा कलम (१८४, १३४ (७७), १८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंभोरेने धडक दिल्याने अनासाबाई या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या डोक्याला सहा टाके पडले. पायाला जबर मार लागला. त्या लहान मुलीलाही गंभीर मार लागलेला आहे. दोघींवर घाटीत उपचार सुरू आहेत. तर क्रांती चौक परिसरातही एका व्यक्तीला धडक दिल्याचे प्रत्यक्षदर्शीन सांगितले. पोलिसांनीही याला दुजोरा दिला, मात्र याची नोंद पोलिस ठाण्यात झालेली नव्हती.
कार चालक अंभोरेला क्रांती चौक पोलिस ठाण्यात आणल्यानंतर जखमी महिलेच्या नातेवाइकांनी आणि धडक दिलेल्या वाहनधारकांनी गर्दी केली होती. तेव्हा क्रांती चौक पोलिस ठाण्यातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी नागरिकांशी बचावाची झाली. पोलिसांनी तक्रारदारांनाच झापल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
प्रत्यक्षदर्शीन दिलेल्या माहितीनुसार, संकेत अंभोरे नशेत एवढा धुंद होता की त्याने सुसाट कार चालवून समर्थनगर परिसरात तीन ते चार चकरा मारल्या. यावेळी रस्त्यावर अनेक लहान मुले खेळत होती. नागरिक शतपावली करण्यासाठी जात असताना त्यांच्या समोर हा प्रकार घडल्याने सर्वजण भयभीत झाले होते.