The war increased the prices of gold and silver
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : इराण-इस्त्रायल युद्धाचा भडका उडाल्यामुळे जागतिक बाजारात मोठी खळबळ उडाली असून, याचा थेट परिणाम म्हणून स्थानिक सराफा बाजारात सोने-चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदारांची सोने खरेदीकडे मोठी धाव वाढल्याने अवघ्या दोन दिवसांत सोन्यात ९ हजार, तर चांदीत १६ हजारांची मोठी उसळी पाहायला मिळाली. परिणामी शहरात प्युअर सोन्याचा तोळा तब्बल १ लाख ७४ हजारांवर पोहोचला आहे, तर चांदीनेही ३ लाखांचा टप्पा ओलांडून प्रतिकिलो ३ लाख १ हजार रुपयांचा नवा उच्चांक गाठला आहे.
अमेरिका, इराण आणि इस्रायल
यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजार आणि इतर गुंतवणुकीतील जोखीम वाढली आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदारांनी सोन्याला मोठी पसंती दिली आहे.
शुक्रवारी (दि. २७) प्युअर सोने प्रतितोळा १ लाख ६५ हजार रुपयांच्या घरात होते. मात्र युद्धाच्या बातम्या धडकताच त्यात अवघ्या दोन दिवसांत ९ हजार रुपयांची वाढ होऊन ते १ लाख ७४ हजार रुपयांवर पोहोचले. सोन्यासोबतच चांदीनेही मोठी उसळी घेतली आहे. मागील दोन दिवसांत चांदी १६ हजार रुपयांनी वधारली असून, सोमवारी (दि.२) शहरातील सराफा बाजारात एक किलो चांदीची ३ लाख १ हजार रुपये दराने विक्री झाली.
सोने-चांदी आणखी महागणार? युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत निर्माण झालेली अशांतता आणि अनिश्चिततेमुळे सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून कल वाढतच आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू झाली आहे. हा युद्धाचा तणाव लवकर निवळला नाही, तर सोने आणि चांदीचे भाव आणखी वध- ारतील, अशी शक्यता जिल्हा सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी व्यक्त केली आहे.