शेवटच्या क्षणी शिवसेना-भाजपची युती तुटली File Photo
छत्रपती संभाजीनगर

शेवटच्या क्षणी शिवसेना-भाजपची युती तुटली

जिल्हा परिषदेतही फिसकटले, काहींना अधिकृत एबी फॉर्म, काही जण पुरस्कृत

पुढारी वृत्तसेवा

The Shiv Sena-BJP alliance broke up at the last moment

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

महापालिकेनंतर जिल्हा परिषद निवडणुका युतीत लढण्याचा निर्णय शिवसेना-भाजपकडून घेण्यात आला. त्यानुसार जागा वाटपातही दोन्ही पक्षांचे एकमत झाले. परंतु उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही पक्षांकडून एकमेकांविरोधात अधिकृत एबी फॉर्म देऊन उमेदवार उभे करण्यात आले. त्यानंतर उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी उर्वरित जागांवर पक्षाच्याच अपक्षांना पुरस्कृत उमेदवार करून दोन्ही पक्षांकडून युती तुटली यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

आता पुरस्कृतांचा प्रचारही करू युतीत सिल्लोड, सोयगाव वगळता शिवसेनेने २५ आणि भाजपने २७ जागांवर उमेदवार देण्याचे ठरले, परंतु सेनेने तब्बल ४८ ठिकाणी उमेदवारांना एबी फॉर्म दिले. त्यामुळे आता भाजपने ११ गट आणि १९ गणांमध्ये पक्षाच्या अपक्षांनाच पुरस्कृत उमेदवार केले आहे. सेनेने एबी फॉर्म देत दगा केला. त्यामुळे आता आम्ही पुरस्कृतांचा उघडपणे प्रचार करणार आहोत.
अतुल सावे, ओबीसी कल्याणमंत्री, भाजप
मैत्रीपूर्णमध्ये पुरस्कृतांचा प्रचार नको भाजपने शिवसेना उमेदवारांविरोधात काही ठिकाणी अधिकृत एबी फॉर्म दिले. त्यामुळेआम्हीही उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने आता युतीऐवजी आम्ही दोन्ही पक्ष मैत्रीपूर्ण लढणार आहोत. परंतु पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसाठीच ही लढत मैत्रीपूर्ण असेल. जेथे पुरस्कृत उमेदवार आहेत, तेथे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी प्रचाराला जाऊ नये, असे संकेत असतात. ते जर एकाने हे संकेत मोडले, तर दुसराही मोडेल.
- संजय शिरसाट, पालकमंत्री

महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी युती तुटली होती. यात शिवसेनेला भाजपने कमी जागा दिल्याने संतापलेल्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधामुळे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी युती तुटल्याचे जाहीर केले होते. या निवडणुकीत भाजपने ९२, तर सेनेने सर्वाधिक ९७ ठिकाणी उमेदवार दिले. परंतु या निवडणुकीत भाजपने ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वात तब्बल ५७ नगरसेवक निवडून आले. स्पष्ट बहुमतापासून भाजप केवळ एक नगरसेवक कमी राहिला.

त्यामुळे जिल्हा परिषद दोघांनी युतीत लढविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सर्व रणनीतीही ठरविली गेली. जागा वाटपात ६४ गटांपैकी सिल्लोड-सोयगाव वगळून सेनेला २५ गट आणि भाजपला २७ गट देण्यात आले. युतीचे ठरल्यानंतरही ऐन उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सेनेने काही ठिकाणी आपल्या उमेदवारांना भाजप उमेदवारांविरोधात एबी फॉर्म दिले.

त्यावर भाजपनेही सेनेच्या विरोधात काही उमेदवारांना अधिकृतरीत्या एबी फॉर्म दिले. उमेदवारी माघारीवेळी पालकमंत्री शिरसाट यांच्यासोबत चर्चा करून युती कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करू, असे मंत्री सावे म्हणाले होते. परंतु मंगळवारी (दि. २७) उमेदवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी सेनेने भाजपविरोधातील उमेदवारांना माघार घेण्याची तयारी दर्शविली नाही. त्यामुळे भाजपनेही तीच भूमिका ठेवली. त्यानंतर ज्या ठिकाणी दोन्ही पक्षांना आपापल्या उमेदवारांना एबी फॉर्म देणे शक्य झाले नाही, तेथे पक्षाच्याच अपक्षांना पाठिंबा दर्शवून पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT