The seven newly appointed judges of the bench were felicitated by the lawyers' association
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: विधिज्ञ म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि मूल्यांची जपणूक करीत सातत्यपूर्ण कामामुळेच आज उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झालेल्या सर्वांचाच गुणगौरव करण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली आहे. नव्याने न्यायमूर्ती झालेल्यानी त्यांची पुढची वाटचाल अत्यंत काळजीपूर्वक आणि निष्ठेने करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी रविवारी (दि.११) केले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातून न्यायमूर्तीपदी नेमणूक झालेल्या न्यायमूर्तीचा खंडपीठ वकील संघातर्फे रविवारी आयोजित सत्कार कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर खंडपीठाच्या वरिष्ठ तथा प्रशासकीय न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांच्यासह नवनियुक्त सत्कारमूर्ती न्या. सचिन देशमुख, न्या. महेंद्र नेर्लीकर, न्या. अजित कडेठाणकर, न्या. सिद्धेश्वर ठोंबरे, न्या. वैशाली जाधव पाटील, न्या. आबासाहेब शिंदे, न्या. हितेन वेणेगावकर उपस्थित होते. यावेळी सर्व सातही नवनियुक्त न्यायमूर्तीचा सत्कार करण्यात आला.
यावेळी न्या. वराळे म्हणाले, की नवीन न्यायमूर्तीनी नवीन वकिलांना प्रेरणा मिळेल, अशी वाटचाल करायला हवी. ज्येष्ठांप्रती सतत आद राची वागणूक, गौरव हा आपल्या कृतीतून दिसायला हवा. मात्र न्यायदान करताना कर्तव्यकठोर होऊन ज्येष्ठ आणि कनिष्ठ असा भेद न ठेवता न्यायदानाची भूमिका पार पाडावीच लागेल. संविधानाने आपल्याला दिलेली न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांची जपणूक करीतच आपली वाटचाल हवी. यातूनच देश म्हणून आपली सर्वांगीण प्रगती साधता येणार आहे, असेही ते म्हणाले.
या प्रसंगी न्या. विभा कंकणवाडी यांनीही मार्गदर्शन केले. हा सत्कार समारंभ हा एक अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण असल्याचे नमूद करीत त्यांनी, शिस्तबद्ध आणि प्रामाणिक प्रयत्न आणि त्यात मूल्यांची जपणूक करणाऱ्यांचा हा सत्कार असल्याचे म्हटले. या नवीन न्यायमूर्तीकडून सर्वांच्याच मोठ्या अपेक्षा असल्याचे सांगत त्यांनी न्यायव्यवस्थेकडूनच खूप अपेक्षा वाढत असल्याने त्यांच्यासमोरील आव्हानेही मोठी आहेत, असे सांगितले.
कनिष्ठ वकिलांनी सतत ज्ञान मिळविण्याचा आणि ज्येष्ठांकडून शिकण्याची तयारी ठेवली तर यापुढे त्यांच्यासमोरही खूप मोठ्या संधी आहेत, हे लक्षात घ्यावे, असे त्या म्हणाल्या. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ व्ही. डी. साळुंके, नंदकुमार खंदारे, राजेंद्र देशमुख, आर. एन. धोर्डे, नितीन चौधरी यांच्यासह सत्कारमूर्ती न्यायमूर्तीनी मनोगत व्यक्त केले. खंडपीठ वकील संघाच्या अध्यक्षा योगिता थोरात क्षीरसागर यांनी स्वागत आणि प्रस्ताविक केले. सूत्रसंचालन नेहा कांबळे यांनी केले तर वकील संघाचे सचिव श्रीकृष्ण चौधरी यांनी आभार मानले.
ही कसली समता आणि बंधुता ?
आपल्या संबोधनात न्या. वराळे यांनी आपल्या मनात असलेली खंत बोलून दाखविली. आपल्या संविधानाने आपल्याला न्याय, समता आणि बंधुत्व ही अमूल्य मूल्ये दिली. मात्र आज ७५ वर्षांतही ती आपण पूर्णपणे आत्मसात करू शकलो नाही, असे त्यांनी अतिशय व्यथित होत सांगितले. केवळ आपल्यासारख्या न दिसणाऱ्या एका भारतीयाला, तो ओरडून आपण भारतीय असल्याचे सांगत असताना जमावाने अत्यंत क्रूरपणे त्याची हत्या केली. ही कसली समता आणि बंधुता? इतक्या वर्षांनंतर आपण खरेच संविधानाचे पालन करतो का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
दृष्टिकोन बदलत स्वतःकडे बघण्याची गरज
आपल्या संविधानानेच आपल्याला प्रत्येक गोष्टीचा प्रतिवाद करण्याची न्याय्य मुभा दिलेली असताना, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा जाळण्याची कृती ही विवेकशून्यतेची ठरते. अशा विवेकशून्य कृतीवर कसे व्यक्त व्हायचे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आपण विवेकपूर्णपणे, पूर्वग्रह संपुष्टात आणून आपला दृष्टिकोन बदलत स्वतःकडे बघण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.